Kalyan Crime : ‘या भागात राहायचं असेल, तर तुझी बायको आमच्याकडे पाठव’, कल्याण टिटवाळ्यातील धक्कादायक घटना
Kalyan Crime : कल्याण टिटवाळा भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गावगुंडांनी विवाहितेचा विनयभंग करत भर रस्त्यात तिला नग्न करण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांपूर्वी पुण्यात स्वारगेट एसटी डेपोच्या परिसरात एका बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाला होता.

महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदे बनवण्यात आले आहेत. मात्र, तरीही महिलांविरोधात घडणारे गुन्हे कमी झालेले नाहीत. आजच्या महिला या चूल-मूल इथपर्यंतच मर्यादीत नाहीत, त्यांनी सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. अगदी फायटर पायलट ते कमांडो बनून त्या देशाच्या सीमेवर शत्रुशी दोन हात करत आहेत. महिलांची ही प्रगती काही पुरुष प्रधान मानसिकतेच्या लोकांना खुपते. फक्त गाव पातळीवरच नाही, शहरातही असे लोक आहेत. वेगवेगळ्या स्वरुपात त्यांचा चेहरा समोर येत असतो. महिला एकाबाजूला प्रगतीची शिखरं सर करत असताना त्यांना दुसऱ्याबाजूला अत्याचाराचा सुद्धा सामना करावा लागतोय, हे वास्तव आहे.
काही दिवसांपूर्वी पुण्यात स्वारगेट एसटी डेपोच्या परिसरात एका बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाला होता. आता अशीच एक धक्कादायक घटना कल्याण टिटवाळ्यात समोर आली आहे. गावगुंडांनी विवाहितेचा विनयभंग करत भर रस्त्यात तिला नग्न करण्याचा प्रयत्न केला. यावेळी, वाचवण्यास आलेल्या पतीलाही बेदम मारहाण केली. “या भागात राहायचे असल्यास तुझी बायको आमच्याकडे पाठव” अशी या गुंडांनी पतीकडे अजब मागणी केली.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने काय सांगितलं?
या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. घटना समोर आल्यानंतरही पोलिसांनी कठोर कारवाई न करता फक्त एनसी दाखल करून कुटुंबाला घरी जाण्याचा सल्ला दिला. स्थानिक पोलीस ठाण्यातून न्याय न मिळाल्याने पीडित कुटुंबाने गुन्हा दाखल करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. मात्र याबाबत कल्याण तालुका टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी पीडितेने केलेले आरोप फेटाळले. दोन्ही गटातील परस्पर सहा जणांवर विरोधात एनसी दाखल असल्याचे सांगत व्हिडिओ असल्यास तपास करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
