दीड वर्षाच्या बाळाला बस स्टँडवर सोडून जन्मदात्री निघून गेली, अशी कशी आई देव लेकराला देते?

साताऱ्यात एका मातेने आपल्या पोटच्या लेकरुला बस स्टँडवर एकटं सोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या दीड वर्षाच्या लेकरुला बस स्टँड परिसरात एकटं सोडून जाताना जन्मदात्रीला काहीच कसं वाटलं नसेल? असा प्रश्न उपस्थित होतोय.

दीड वर्षाच्या बाळाला बस स्टँडवर सोडून जन्मदात्री निघून गेली, अशी कशी आई देव लेकराला देते?
प्रातिनिधिक फोटो

सातारा : आई-वडील आपल्यासाठी देव असतात. ते आपल्याला काय हवं-नको ते बघतात. लहानपणी बऱ्याचदा वडिलांपेक्षा आई मुलांच्या जास्त जवळची असते. पण काही माता या विकृत असतात. साताऱ्यात देखील अशाच एका मातेचा विकृतपणा समोर आला आहे. एका मातेने आपल्या पोटच्या लेकरुला बस स्टँडवर एकटं सोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या दीड वर्षाच्या लेकरुला बस स्टँड परिसरात एकटं सोडून जाताना जन्मदात्रीला काहीच कसं वाटलं नसेल? असा सवाल शहरातील नागरिकांना सतावतोय. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.

नेमकं प्रकरण काय?

सातारा एसटी स्टँडमधील पार्सल विभाग शेजारील पोर्चमध्ये एका दीड वर्षाच्या बालकास एकट्याला सोडून अज्ञात महिला परागंदा झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्या बालकाला मातेने एकटेच का सोडलं असेल? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान सातारा एसटी महामंडळाच्या वरिष्ठ आगार प्रमुखांनी त्या बालकाची रवानगी आपल्या कर्मचाऱ्यांसह सातारा शहर पोलीस ठाण्यात केली. सुमारे तीन तास त्या बालकाला सांभाळण्याचे दिव्य काम शहर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी पार पाडले.

सीसीटीव्हीत बाळ सोडून जाणारी महिला कैद

नंतर याबाबतची माहिती एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून घेतल्यानंतर त्या बालकाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करून पुढील कारवाई पोलीस करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. सातारा एसटी स्टँड परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक महिला आणि तिच्यासोबत लहान मुलगी दिसत आहे. या महिलेच्या कडेवर दिसणार हे लहान मुल असून संबंधित महिलेचा शोध पोलीस घेत आहेत.

पहाटे रिक्षातून येऊन पाच दिवसाच्या बाळाला रस्त्यावर सोडले

दरम्यान, काही दिवसांपूर्वी ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहरात देखील असाच एक प्रकार समोर आला होता. कल्याण मलंग रोडवरील चेतना शाळा परिसरात रस्त्यालगत भल्या पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. एक महिला सकाळीच रिक्षातून आली आणि तिने चेतना शाळेच्या परिसरात चार ते पाच दिवसांचा नवजात शिशू सोडून दिला आणि ती तिथून निघून गेली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. मानपाडा पोलिसांनी या बाळाला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला होता. मात्र, या प्रकारामुळे कल्याण परिसरात एकच खळबळ उडाली होती.

गुजरातमध्येही अशीच एक घटना

दरम्यान, सोशल मीडियावर सध्या एका 11 महिन्यांच्या गुबगुबीत, गोड बाळाचा फोटो व्हायरल होतोय. या बाळाचे नेमके आई-वडील, नातेवाईक कोण आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत. खरंतर एक व्यक्ती हे बाळ 9 ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास गुजरातची राजधानी असलेल्या गांधीनगर शहरातील एका गोशाळे बाहेर बेवारसपणे ठेऊन गेली होती. या बाळाचा रडण्याचा आवाज ऐकून तिथले स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर सर्वप्रकार समोर आला. विशेष म्हणजे या बाळाला गोशाळेबाहेर सोडून जाणारा व्यक्ती कॅमेऱ्यातही कैद झाला आहे. पोलीस त्या व्यक्तीचाही शोध घेत आहेत.

संबंधित घटना ही 9 ऑक्टोबर रोजी रात्री नऊच्या सुमारास घडली. जेव्हा स्थानिकांना या घटनेची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी तातडीने पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलीस त्या बाळाला गांधीनगरच्या सिव्हिल रुग्णालयात घेऊन गेले. तिथे बाळाचे सर्व टेस्ट करण्यात आल्या. या टेस्टचा रिपोर्टही लगेच समोर आला. सर्व टेस्ट या नॉर्मल आहेत. पोलीस बाळाच्या आई-वडिलांचा शोध घेत आहेत. या दरम्यान परिसरातील एका महिलेने बाळाच्या आई-वडिलांचा तपास लागत नाही तोपर्यंत जबाबदारी स्वीकारली आहे. ती महिला सध्या बाळाचं पालनपोषण करत आहे.

हेही वाचा :

पत्नीच्या चारित्र्यावर संशय, सोलापुरात SRPF जवानाचा गोळीबार, एकाचा मृत्यू

जुन्या वादातून मित्रांमध्ये राडा, नागपुरात चौघांकडून तरुणाची चाकू भोसकून हत्या

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI