फेसबूकवर मैत्री, गिफ्टचं आमिष… ट्यूशन टीचरला लाखोंचा गंडा
सोशल मीडियाचा वापर सध्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र याच सोशल मीडियावरून मैत्रीचं जाळं टाकून, अनेकांना लुबाडण्याच्या घटनाही घडत असतात. मुंबईतील एका शिक्षिकेला अशाच फसवणुकीला सामोरं जावं लागलं आणि तिला तब्बल 8 लाख रुपयांना लुटण्यात आलं

सोशल मीडियाचा वापर सध्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र याच सोशल मीडियावरून मैत्रीचं जाळं टाकून, अनेकांना लुबाडण्याच्या घटनाही घडत असतात. मुंबईतील एका शिक्षिकेला अशाच फसवणुकीला सामोरं जावं लागलं आणि तिला तब्बल 8 लाख रुपयांना लुटण्यात आलं. 68 वर्षांच्या एक महिलेशी भामट्याने फेसबूकवरून ओळख वाढवली. आणि गिफ्ट देण्याचे आमिष दाखवत तिच्याकडून लाखो रुपये लुटले. आपण इंटरनॅशनल पायलट असल्याचं भासवत त्याने त्या महिलेशी मैत्री केली होती. याप्रकरणी माहिम पोलिस स्टेशनमधये तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
अशी केली फसवणूक
महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 12 मे रोजी तिला ‘देव पटेल’ नावाच्या व्यक्तीकडून फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट आली होती, ती तिने स्वीकारली. यानंतर त्यांनी गप्पा मारण्यास सुरुवात केली. त्या व्यक्तीने चॅटमध्ये सांगितले की, तो ब्रिटिश एअरवेजचा पायलट आहे. ती नियमितपणे त्याच्याशी चॅटवर बोलू लागली. काही दिवसांनी त्याने महिलेसाठी गिफ्ट पाठवल्याचे सांगितले.
पीडितेने सांगितले की, 30 मे रोजी तिला फोन आला. फोनवरून दुसऱ्या बाजूने एक महिला बोलत होती, दीक्षिता अरोरा असे तिचे नाव होते आणि ती दिल्ली कस्टम्समधील होती, असे सांगितले. दुबईहून तुमच्या नावाने पार्सल आले आहे, मात्र ते घेण्यासाठी 70 हजार रुपये जमा करावे लागतील, असे सांगितले. यावर पीडित महिलेने तातडीने यूपीआयद्वारे 70 हजार रुपये पाठवले. यानंतर त्या महिलेला पुन्हा फोन आला आणि तिला सांगण्यात आलं की पार्सलमध्ये 80 ब्रिटीश पौंड स्टर्लिंग आहे, जे बेकायदेशीरपणे पाठवले गेले होते आणि तिला आणखी 2.95 लाख रुपये द्यावे लागतील, अन्यथा गुन्हे शाखा तिला अटक करेल, अशी भीती दाखवण्यात आली. यामुळे भेदरलेल्या महिलेने पुन्हा पैसे पाठवले, त्यानंतरही तिला सतत धमक्या येत होत्या.
1 ते 10 जून दरम्यान पीडित महिलेने अंदाजे 8.15 लाख रुपये ट्रान्सफर केले. दरम्यान, पायलट असल्याचा दावा करणाऱ्या तिच्या फेसबुक मित्रानेही कॉल आणि मेसेजला प्रतिसाद देणे बंद केले. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्या महिलेच्या लक्षात आले. आणि तिने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी भादंवि कलम 420 अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
