Pradeep Sharma : प्रदीप शर्मा यांना दिलासा नाहीच, जामीन अर्जावर कोर्टाने दिला ‘हा’ निर्णय

उच्च न्यायालयात दोन्ही पक्षाची बाजू ऐकल्यानंतर खंडपीठाने आपला निर्णय राखून ठेवला होता. मुंबई उच्च न्यायालयात एनआयएच्या वतीने अतिरिक्त सोलिसीटर जनरल अॅड. अनिल सिंह यांनी युक्तिवाद केला.

Pradeep Sharma : प्रदीप शर्मा यांना दिलासा नाहीच, जामीन अर्जावर कोर्टाने दिला हा निर्णय
प्रदीप शर्मा यांचा जामिन अर्ज फेटाळला
Image Credit source: Google
| Edited By: | Updated on: Jan 23, 2023 | 9:20 PM

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर सापडलेली स्फोटके आणि त्यानंतर मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणात आरोपी असलेले माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांचा जामीन अर्ज आज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. यामुळे प्रदीप शर्मा यांना झटका बसला आहे. प्रदीप शर्मा यांच्या जामीन अर्जावर न्यायमूर्ती रेवती डेरे मोहिते आणि न्यायमूर्ती आर एन लड्डा यांच्या खंडपीठाने आज निर्णय देत जामीन अर्ज फेटाळला आहे. यामुळे शर्मा यांचा जेलमधील मुक्काम वाढला आहे. वरील प्रकरणात एनआयएने जून 2021 मध्ये शर्मा यांना अटक केली होती. याआधी प्रदीप शर्मा यांनी मुंबई सत्र न्यायालयात जामीन मिळविण्यासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र सत्र न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

उच्च न्यायालयात दोन्ही पक्षाची बाजू ऐकल्यानंतर खंडपीठाने आपला निर्णय राखून ठेवला होता. मुंबई उच्च न्यायालयात एनआयएच्या वतीने अतिरिक्त सोलिसीटर जनरल अॅड. अनिल सिंह यांनी युक्तिवाद केला.

यावेळी दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या स्टेटमेंटमध्ये वाझे आणि शर्मा यांची भेट झाल्याचं कबूल केल्याचे सिंह यांना न्यायालयाला सांगितले. कॉल लोकेशनही आम्ही सादर केलेय. प्रदीप शर्मा यांना जामीन देण्यात येऊ नये, असा युक्तिवाद एनआयएच्या वतीने करण्यात आला होता.

मुंबई उच्च न्यायालयात प्रदीप शर्मा यांचे वकील अॅड. आबाद पोंडा यांनी एनआयएच्या मागणीला विरोध केला होता. एनआयए 4 साक्षीदार असल्याचे सांगितले, यातील 2 तर पोलीस कर्मचारी आहेत. त्यांच्या साक्षीला गृहीत कसं मानणार ? असा युक्तिवाद यावेळी अॅड. पोंडा यांनी केला.

इतर दोघांच्या साक्षीत मोठी तफावत आहे. वेळ दोघंही वेगवेगळ्या वेळा सांगतायत, या साक्षी विश्वासार्ह नाही. त्याचबरोबर 17 फेब्रुवारी 2021 ला भेट झाल्याचा दावा खोटा असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. दोघांच्या जबाबानुसार प्रदीप शर्मा 9 ते 9:30 दरम्यान सांताक्रुझला होते.

मात्र सिडीआर लोकेशननुसार शर्मा साऊथ मुंबईत होते. 17 फेब्रुवारी 2021 ला भेट झाल्याचा दावा एनआयए करत आहेत, मात्र दोघांच्या लोकेशनमध्ये मोठी तफावत आहे हे स्पष्ट होतंय. वाझे यांचं लोकेशन मस्जिद बंदर तर त्याचवेळी शर्मा यांचं रे रोड, शिवडी आणी चेंबूर परिसरात लोकेशन होतं.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार मनसुखचे लोकेशन ऐरोलीत होतं. ज्या जागी शर्मा कधी गेलेच नाही म्हणजे हे जबाब विश्वासक नाही, असा युक्तिवाद शर्मा यांच्या वतीने अॅड. आबाद पोंडा यांनी केला होता. एनआयएने विशेष न्यायालयात निलंबित पोलीस सचिन वाझे, एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मासह दहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले होते.