गरीब असले म्हणून काय झालं? माणूसच आहेत, फिजिशियन नाही म्हणून गरोदर महिलेला चार तास ताटकळत बसवलं?

केडीएमसीच्या रुग्णालयात एक भयानक प्रकार समोर आला आहे. प्रसूतीगृहात फिजिशियन नसल्याने एका गरोदर महिलेस प्रसूतीसाठी तब्बल चार तास रुग्णालयाच्या बाहेर ताटकळत बसावं लागल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे.

गरीब असले म्हणून काय झालं? माणूसच आहेत, फिजिशियन नाही म्हणून गरोदर महिलेला चार तास ताटकळत बसवलं?
गरीब असले म्हणून काय झालं? माणूसच आहेत, फिजिशियन नाही म्हणून गरोदर महिलेला चार तास ताटकळत बसवलं?

कल्याण (ठाणे) : केडीएमसी महापालिकेतील बऱ्याच गोष्टींचा बोजवारा उडाल्याच्या अनेक घटना याआधीच अनेकवेळा समोर आलेल्या आहेत. नुकतंच खड्ड्यांवरुन महापालिकेवर प्रचंड टीका होत असताना केडीएमसी आरोग्य यंत्रणेचा कशाप्रकारे बोजवारा उडाला आहे ते दाखवणारी धक्कादायक घटना आता समोर आली आहे. केडीएमसीच्या रुग्णालयात एक भयानक प्रकार समोर आला आहे. प्रसूतीगृहात फिजिशियन नसल्याने एका गरोदर महिलेस प्रसूतीसाठी तब्बल चार तास रुग्णालयाच्या बाहेर ताटकळत बसावं लागल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. यावेळी महिला प्रचंड वेदनांनी व्हिव्हळत होती. संबंधित गर्भवती महिलेवर सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नेमकं प्रकरण काय?

कल्याणमध्ये राहणाऱ्या इरफाना शेख यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यामुळे प्रसूतीसाठी नेमकं कुठे जावं हे त्यांना कळत नव्हतं. अखेर नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांच्या सल्ल्यानुसार त्या केडीएमसीच्या शासकीय रुग्णालयात गेल्या. पण तिथे त्यांना खूप विचित्र अनुभव आला. इरफाना यांना त्रास होत होता. पण रुग्णालय प्रशासनाने त्यांना तब्बल चार तास ताटकळत ठेवत बाहेरच बसून ठेवलं, असा आरोप इरफाना यांच्या नातेवाईकांनी केला आहे. विशेष म्हणजे चार तास ताटकळत ठेवल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला, असा दावा महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे.

मनसे पदाधिकाऱ्यांनी महिलेला खासगी रुग्णालयात नेलं

अखेर या प्रकरणाची माहिती मनसेचे पदाधिकारी रुपेश भोईर यांच्यापर्यंत पोहोचली. ते तातडीने रुग्णालयात दाखल झाले. तिथे त्यांनी डॉक्टरांना जाब विचारला. यावेळी प्रसूतीगृहात फिजिशियन नसल्याने उपचार केले गेले नाहीत, असं रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आलं. त्यांच्या या उत्तरावर रुपेश भोईर यांनी संताप व्यक्त केला. पण महिलेची प्रकृतीकडे लक्ष देणं जास्त गरजेचं होतं. त्यामुळे त्यांनी महिलेला तातडीने इतर कार्यकर्त्यांच्या मदतीने एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. या प्रकरणावरुन मनसे पदाधिकाऱ्यांसह महिलेच्या नातेवाईकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

रुग्णालयाची नेमकी भूमिका काय?

दरम्यान, संबंधित केडीएमसीच्या प्रसूती गृहाच्या डॉक्टर सपना रामोडी यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. “संबंधित गरोदर रुग्णाची शुगर आणि हृदयाचे ठोके जास्त होते. तिच्या सिझरीनसाठी काही सुविधांची गरज होती. त्यामुळे तिला बड्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. हा सल्ला तिच्या हिताचा होता. मात्र फाईल फेकल्याचा आरोप चुकीचा आहे”, असं स्पष्टीकरण डॉक्टर सपना रामोडी यांनी दिलं आहे.

हेही वाचा :

नागपूरमध्ये कुंटणखाना चालविणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, दोन महिलांची सुटका

साडेतीन कोटींचा चरस-गांजा, नेपाळी प्रवासी आणि पुणे ग्रामीण पोलीस, मुंबई-गोवा हायवेवर धरपकड, गुन्ह्यात पाकिस्तानचंही कनेक्शन?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI