तरुणाला धबधब्यात बुडताना पाहून मित्रांचा पोबारा, घरी वेगळाच बनाव, अखेर तीन दिवसांनी बिंग फुटलं

18 वर्षीय धीरज माळीसह तीन तरुण आणि त्यांच्या दोन मैत्रिणी असे एकूण 5 जण तीन दिवसांपूर्वी माहुलीच्या जंगलात फिरायला गेले होते. मात्र धीरज पाण्यात बुडाला असताना त्याला टाकून मित्रांनी पळ काढला

तरुणाला धबधब्यात बुडताना पाहून मित्रांचा पोबारा, घरी वेगळाच बनाव, अखेर तीन दिवसांनी बिंग फुटलं
धबधब्यात बुडून तरुणाचा मृत्यू

सुनील घरत, टीव्ही 9 मराठी, शहापूर : मित्रांसोबत फिरायला गेलेल्या 18 वर्षीय तरुणाचा मृतदेह अखेर माहुलीच्या धबधब्यातील पाण्यात तरंगताना आढळला. शहापूर तालुक्यातील खोर, पिवळी वन विभागच्या हद्दीत तरुण मृतावस्थेत आढळला. भिवंडी कामत घर येथून 17 ऑक्टोबरला धीरज कमलेश माळी फिरायला गेला होता. मात्र मित्र बुडाल्यानंतर सोबतच्या मित्रांनी तो अन्यत्र निघून गेल्याचा बनाव रचला होता.

काय आहे प्रकरण?

18 वर्षीय धीरज माळीसह तीन तरुण आणि त्यांच्या दोन मैत्रिणी असे एकूण 5 जण तीन दिवसांपूर्वी माहुलीच्या जंगलात फिरायला गेले होते. मात्र धीरज पाण्यात बुडाला असताना त्याला टाकून मित्रांनी पळ काढला. आम्ही भिवंडीला गेलो असताना त्याला एका मित्राचा फोन आला व तो त्यांच्यासोबत निघून गेला. कोणत्या मित्राचा फोन आला ते आम्हाला काही माहीत नाही, असे मित्रांनी त्याच्या घरी सांगितले. नातेवाईकांनी शोधाशोध केल्यानंतरही धीरजचा थांगपत्ता लागत नसल्याने शेवटी नारपोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली.

पोलिसांची मित्रांसोबत शोध मोहीम

दुसऱ्या दिवशी पोलिसांनी धीरजसह फिरायला गेलेल्या मित्रांना सोबत घेऊन शोधमोहीम सुरु केली. पण मित्रांनी पोलिसांना मानस मंदिर परिसर, माहुली पूर्वेकडील जंगलात फिरवले आणि पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला. शेवटी अंधार झाल्याने शोध मोहीम बंद करण्यात आली.

अखेर बनाव उघड

दुसऱ्या दिवशी पोलिसांनी धीरज सोबत फिरायला गेलेल्या 2 मुली आणि एका मित्राला सोबत घेतले. पुन्हा शोध मोहीम सुरू केली. त्या वेळीही मित्रांनी पोलिसांसमोर बनाव रचण्याचा प्रयत्न केला. शेवटी पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच दोन्ही मुलींनी पिवळी, खोर येथील माहुलीच्या घनदाट जंगलात पायवाटेने अतिशय उंच ठिकाणी असलेल्या धबधब्याजवळ नेले. तिथे धीरज माळी या 18 वर्षीय तरुणाचा मृतदेह पाण्यात तरंगलेला दिसला.

तिघे ताब्यात, एक जण फरार

भिवंडी पोलिसांनी दोन मुली आणि एका मित्राला ताब्यात घेतले असून सोबत असलेला पाचवा मित्र रिक्षा ड्रायव्हर असून तो फरार झाला आहे.

संबंधित बातम्या :

गोदावरीत उतराल तर जीवास मुकाल; रामकुंड परिसरात 4 दिवसांत 4 बुडाले

एकमेकांचा हात धरुन चौघे तलावात आंघोळीला उतरले, गटांगळ्या खाताना मदतीसाठी आरडाओरड, पण…

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI