डॉकयार्ड रोड स्टेशनवर महिलेचा गळा चिरणारा सापडला, 23 वर्षीय एक्स बॉयफ्रेण्डकडून हल्ला

डॉकयार्ड रोड स्टेशनवर महिलेचा गळा चिरणारा सापडला, 23 वर्षीय एक्स बॉयफ्रेण्डकडून हल्ला
डॉकयार्ड रोड स्टेशनवरील हल्ल्याची सीसीटीव्ही दृश्य

घटनेनंतर अवघ्या 48 तासात 23 वर्षीय आरोपी मोहित आगळे उर्फ बंटीला सीबीडी बेलापूर भागातून अटक करण्यात आली. मोहितने हल्ला केलेली 21 वर्षीय महिला विधवा असून तिला चार वर्षांची मुलगी आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अनिश बेंद्रे

Jan 06, 2022 | 8:06 AM

मुंबई : डॉकयार्ड रोड रेल्वे स्टेशनवर महिलेचा गळा चिरण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिच्या एक्स-बॉयफ्रेण्डला अटक करण्यात आली आहे. 23 वर्षीय मोहित आगळेला पोलिसांनी नवी मुंबई भागातून अटक केली. सुदैवाने मध्य रेल्वेच्या सिनिअर तिकीट बुकिंग ऑफिसरला वेळीच हा प्रकार लक्षात आल्यामुळे त्याने महिलेचे प्राण वाचवले, मात्र तिची प्रकृती गंभीर आहे. हार्बर रेल्वेवरील डॉकयार्ड रोड स्टेशनवर (Dockyard Road Station Lady Attack) घडलेल्या हल्ल्याचा प्रकार स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला होता.

अफेअर असल्याच्या संशयातून हल्ला

घटनेनंतर अवघ्या 48 तासात 23 वर्षीय आरोपी मोहित आगळे उर्फ बंटीला सीबीडी बेलापूर भागातून अटक करण्यात आली. मोहितने हल्ला केलेली 21 वर्षीय महिला विधवा असून तिला चार वर्षांची मुलगी आहे. महिलेचे अन्य कोणासोबत अफेअर असल्याच्या संशयातून हल्ला केल्याची कबुली त्याने दिली. हा हल्ला पूर्वनियोजित होता. पीडित महिलेची प्रकृती गंभीर आहे.

काय आहे प्रकरण?

जखमी महिला आणि 23 वर्षीय आरोपी हे पुण्यातील तळेगाव भागात शेजारी-शेजारी राहत होते. अडीच वर्षांच्या ओळखीनंतर दोघं काही काळ रिलेशनशीपमध्ये होते, असंही पोलिसांनी सांगितलं. मात्र वारंवार झडणाऱ्या वादांनंतर तिने मोहितशी सगळे संबंध तोडले आणि मुंबईतील शिवडी भागात राहणाऱ्या नातेवाईकांच्या घरी ती लेकीसह चार महिन्यांपासून राहायला आली होती.

वडाळा स्टेशनवर वाद

मोहित तिला वारंवार फोन करायचा, मात्र ती उत्तर द्यायची नाही. एकदा तिने फोन उचलला, तेव्हा मोहितने तिला एकदाच वडाळा रेल्वे स्टेशनवर भेटायला येण्याची विनंती केली. अखेर, एक जानेवारीला महिला बुरखा घालून त्याला भेटायला आली. तिच्यासोबत तिची मुलगीही होती. मोहितने तिला पुन्हा आपल्यासोबत येण्याची विनवणी केली, त्यावरुन दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. वडाळा स्टेशनवरुन तिने ट्रेन पकडली आणि ती निघाली. पण मोहितने तिचा पाठलाग केला आणि डॉकयार्ड रोड स्टेशनवर उतरण्यास भाग पाडलं.

रेझरने गळा चिरला

संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास महिला तिकीट बुकिंग ऑफिसजवळ स्टीलच्या बेंचवर बसली होती. तिच्या मांडीवर तिची मुलगी बसली होती. ट्रेनच्या डब्यापासून सुरु झालेला वाद डॉकयार्ड रोड स्टेशनवरही सुरुच होता. महिलेचं लक्ष नसल्याची संधी साधून त्याने स्वतःजवळ बाळगलेल्या रेझरने तिचा गळा चिरला. महिलेने आरडाओरड करताच मध्य रेल्वेचे बुकिंग क्लार्क आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान धावत आले. प्रथमोपचार करुन तिला जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिलेची प्रकृती गंभीर असून तिच्या मुलीला कुठलीही दुखापत झालेली नाही. पोलिसांनी महिलेच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून लहान मुलीला त्यांच्या ताब्यात दिलं.

संबंधित बातम्या :

स्टेशनवर महिलेचा गळा चिरण्याचा प्रयत्न, रेल्वे अधिकाऱ्यामुळे बचावले प्राण

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें