काल पत्रकारांचे प्रश्न टाळले, आता व्हॉटस अप ग्रुपच सोडला? समीर वानखेडेंचं चाललंय काय?

क्रुझवरील कथित ड्रग्ज पार्टीवरील छाप्यात खासगी व्यक्ती आणि भाजप कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचा दावा केल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी निवडक पत्रकारांचा समावेश असलेला व्हॉट्सअॅप ग्रुप सोडला

काल पत्रकारांचे प्रश्न टाळले, आता व्हॉटस अप ग्रुपच सोडला? समीर वानखेडेंचं चाललंय काय?
समीर वानखेडेंनी व्हॉट्सअॅप ग्रुप सोडला

मुंबई : बॉलिवूडचा किंग शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याच्याशी संबंधित ड्रग्ज प्रकरणाच्या तपासादरम्यान नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी काल पत्रकारांचे प्रश्न टाळले होते, आता काही निवडक पत्रकारांचा समावेश असलेला व्हॉट्सअॅप ग्रुपच सोडल्याची माहिती आहे.

पत्रकारांचा व्हॉट्सअॅप ग्रुप सोडला

राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई-गोवा क्रुझवरील कथित ड्रग्ज पार्टीवरील छाप्यात खासगी व्यक्ती आणि भाजप कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचा दावा केल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी निवडक पत्रकारांचा समावेश असलेला व्हॉट्सअॅप ग्रुप सोडला. आरोपांमुळे ते गोंधळलेले दिसत आहेत, असे ट्वीट पत्रकार सुधीर सुर्यवंशी यांनी केले आहे.

नवाब मलिक यांचा आरोप

क्रुझ शिपवर एनसीबीने टाकलेली धाड बनावट होती आणि तिथे कुठलंही ड्रग्ज सापडलं नाही, असा दावा मंत्री नवाब मलिक यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत केला. छापेमारीच्या वेळी एनसीबीच्या पथकासोबत दोन अन्य व्यक्तीही उपस्थित होत्या. ज्यापैकी एक भाजपचा सदस्य आहे, असा दावाही मलिक यांनी केला आहे.

समीर वानखेडे काय म्हणतात?

आम्ही पंचनामा करणाऱ्या 9 जणांची नावं दिली आहे, पूर्ण प्रक्रिया कायदेशीर आहे, असं उत्तर समीर वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्या आरोपांवर दिलं. एनसीबीने प्रेस रिलीज जारी करुन सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत, तरी मी सांगू इच्छितो की आमची यंत्रणा सक्षम आणि व्यावसायिक आहे. एखाद्या व्यक्तीच्या पदापेक्षा NDPS कायदा महत्त्वाचा असतो.

उपमहासंचालकांनी दावे फेटाळले

‘मनिष भानुशाली आणि किरण गोसावी हे रेव्ह पार्टीवरील छाप्याच्या साक्षीदारांपैकी आहेत’ असं एनसीबीने सांगितलं. ‘एनसीबीच्या जुन्या कारवाईचा सूड म्हणून यंत्रणेची प्रतिमा मलीन करण्याच्या प्रयत्नातून हे तथ्यहीन आरोप केले जात आहेत’ असं एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह म्हणाले.

ड्रग्जमुक्त महाराष्ट्राचे ध्येय

‘आमचे मुख्य ध्येय हे समस्येचा समूळ नायनाट करण्याचे आहे. ड्रग्ज पुरवठा साखळी व्यतिरिक्त, पुनर्वसन हीसुद्धा एक समस्या आहे, ज्याचा आम्ही सामना करत आहोत. महाराष्ट्र आणि गोवा पूर्णपणे नशामुक्त करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. जेव्हा आम्हाला एखादी माहिती मिळते, तेव्हा आम्ही नाव आणि व्यक्तिमत्त्व न पाहता त्यावर कारवाई करतो’ असंही सिंह म्हणाले.

संबंधित बातम्या :

आर्यन खानसोबत फोटो, एनसीबी म्हणते आमचा संबंध नाही, कोण आहे किरण गोसावी, ज्याच्यावर राष्ट्रवादीचा गंभीर आरोप?

कुठलही ड्रग्ज सापडलेलं नाही, आर्यन खान प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा गौप्यस्फोट

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI