गाडीचा धक्का लागल्यावरुन वाद, उल्हासनगरात अल्पवयीन मुलाला तिघांनी भोसकलं

उल्हासनगर शहरात राहणारा 16 वर्षांचा पीडित मुलगा 4 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री त्याच्या चुलत भावाला घरी सोडण्यासाठी दुचाकीवरून निघाला होता. याच वेळी तीन टवाळखोर तरुणांनी त्यांचा पाठलाग सुरू केला आणि त्यांना अडवत पैशांची मागणी केली.

गाडीचा धक्का लागल्यावरुन वाद, उल्हासनगरात अल्पवयीन मुलाला तिघांनी भोसकलं
प्रातिनिधीक फोटो

उल्हासनगर : गाडीचा धक्का लागल्याच्या वादातून एका अल्पवयीन मुलाला मध्यरात्रीच्या सुमारास एका टोळक्याने भोसकल्याची घटना ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहरात घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी या प्रकरणी सुरुवातीला एफआयआर न घेतल्याचा आरोप जखमी मुलाच्या कुटुंबीयांनी केला होता. अखेर चार दिवसांनी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपी तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत.

काय आहे प्रकरण?

उल्हासनगर शहरात राहणारा 16 वर्षांचा पीडित मुलगा 4 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री त्याच्या चुलत भावाला घरी सोडण्यासाठी दुचाकीवरून निघाला होता. याच वेळी तीन टवाळखोर तरुणांनी त्यांचा पाठलाग सुरू केला आणि त्यांना अडवत पैशांची मागणी केली.

पैसे द्या, नसतील तर गाडीची चावी द्या, असा धोशा आरोपींनी लावल्याचा आरोप पीडित आहे. पीडित मुलाने नकार देताच या तिघांनी त्याला मारहाण सुरु केली. तसंच त्याच्या कमरेत त्यांनी धारदार शस्त्राने भोसकलं, असा दावा करण्यात आला आहे.

पोलिसांनी तक्रार न घेतल्याचा आरोप

या घटनेनंतर हे तिघे हल्लेखोर पळून गेले, तर पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं. पोलीस तक्रार करण्यासाठी उल्हासनगर पोलीस ठाण्यात त्यांनी धाव घेतली. मात्र तिथे फक्त एनसी नोंदवून घेत एफआयआर न घेताच पोलिसांनी आपल्याला पिटाळून लावल्याचा आरोप मुलाच्या वडिलांनी केला आहे.

ज्यावेळी आपण पोलिसांना कारवाई आणि गुन्हा नोंदवण्याबाबत विचारलं, त्यावेळी आरोपी हे अल्पवयीन असल्याचं सांगत पोलिसांनी कारवाई करणं टाळलं, असा आरोप वडिलांनी केला. अखेर चार दिवसांनी पत्रकारांना हे प्रकरण समजल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली आणि त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत साहिल नावाच्या एका आरोपीला अटक केली.

वाद लूटमार करण्याच्या उद्देशाने नाही, पोलिसांचा दावा

दरम्यान, या सगळ्याबाबत उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांना विचारलं असता, हा वाद लूटमार करण्याच्या उद्देशाने झालेला नसून गाडीला धक्का लागल्याच्या वादातून झाला असल्याची माहिती त्यांनी दिली. आरोपी आणि जखमी हे दोघेही एकमेकांना ओळखत असून जखमी तरुणानेच आम्हाला आरोपीचे नाव आणि पत्ता सांगितला. त्यामुळे हा प्रकार सांगितला जातोय तसा नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं.

या प्रकरणी आरोपी तरुण साहिल याला अटक केली असून जो प्रकार झाला, तोच खरा प्रकार समोर यावा, अशी अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली. या सगळ्यावर पोलिसांनी सध्या कॅमेरासमोर काहीही बोलायला नकार दिलाय.

पाहा व्हिडीओ

संबंधित बातम्या :

अज्ञात वाहनाच्या धडकेत 4 जण ठार; नाशिक-मुंबई महामार्गावरील घटना

गर्लफ्रेण्डशी झालेली मैत्री खटकली, दारु प्यायला बोलावून मित्राचाच काटा काढला

पार्किंगवरुन मामाचा वाद, मध्यस्थी करणाऱ्या भाच्यावर हल्ला, भाऊबीजेलाच चार बहिणींचा ‘दादा’ हरपला

Published On - 8:21 am, Tue, 9 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI