राजावाडी रुग्णालयात उंदराने डोळे कुरतडलेल्या 24 वर्षीय रुग्णाचा मृत्यू

ज्या आयसीयू रुममध्ये ही घटना घडली त्या तळ मजल्यावर उंदरांचा वावर आहे. श्रीनिवासच्या डोळ्यांचा मंगळवारी उंदराने चावा घेतला होता, बुधवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास त्याचे निधन झाले.

राजावाडी रुग्णालयात उंदराने डोळे कुरतडलेल्या 24 वर्षीय रुग्णाचा मृत्यू
राजावाडी रुग्णालयात उंदराने डोळे कुरतडलेल्या रुग्णाचा मृत्यू


मुंबई : मुंबई महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात उंदराने डोळे कुरतडलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. आयसीयूमध्ये उपचार सुरु असताना बेशुद्धावस्थेतील रुग्णाचे डोळे उंदराने कुरतडल्याची गंभीर बाब मंगळवारी समोर आली होती. मात्र बुधवारी रात्री नऊ वाजता 24 वर्षीय श्रीनिवास यल्लपा (Shrinivas Nagesh Yallapa) याची प्राणज्योत मालवली. श्वास घेताना दम लागत असल्यामुळे श्रीनिवासला चार दिवसांपूर्वी घाटकोपरमधील बीएमसीच्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. (Patient Eyes bitten by Rat in ICU of Rajawadi Hospital dies)

ज्या आयसीयू रुममध्ये ही घटना घडली त्या तळ मजल्यावर उंदरांचा वावर आहे. श्रीनिवासच्या डोळ्यांचा मंगळवारी उंदराने चावा घेतला होता, बुधवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास त्याचे निधन झाले. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्याचा मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे, अशी माहिती अधिष्ठात्या विद्या ठाकूर यांनी दिली.

मेंदूज्वर झाल्याने रुग्णालयात उपचार

श्रीनिवास यलप्पाला श्वास घेताना त्रास होत होता. त्रास असह्य झाल्यानंतर त्याला रविवारी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याला मेंदूज्वराचे निदान झाले. तसेच त्याचे यकृतही बिघडल्याचे समोर आले. रुग्णालयात उपचार सुरु असतानाच मंगळवारी सकाळी श्रीनिवासच्या डोळ्यातून रक्त येत असल्याचे त्याच्या नातेवाईकांना दिसले. नातेवाईकांनी निरखून पाहिले असता श्रीनिवासच्या डोळ्यांना उंदराने कुरतडले असल्याचे समजले.

नर्सकडून कुटुंबीयांना उद्धट उत्तरे

हा प्रकार समजल्यानतर तरुणाच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील नर्सना जाब विचारला. मात्र त्यांच्याकडून उद्धट उत्तरे मिळाल्याचा आरोप  नातेवाईकांनी केला आहे. हा प्रकार सर्वत्र समजल्यानंतर राजावाडी येथील मनपा रुग्णालय प्रशासनावर सडकून टीका झाली. रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीबद्दल सर्वत्र संतापाची लाट उमटली. रुग्णालयात उपचार सुरु असलेले इतर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्येही चिंतेचे वातावरण पसरले होते.

भाजपकडून हल्लाबोल

सामान्य माणसाचा जीव शिवसेनेने टांगणीला लावलाय. सायन रुग्णालयात मृतदेहांच्या शेजारी रूग्णांवर उपचार केले जातात. तर राजावाडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उंदीर रुग्णांचे डोळे करतडत आहेत. ही मुंबई आणि महापालिकेची आजची स्थिती आहे. 80 हजार कोटीचं फिक्स डीपॉझिट, 1 हजार 200 कोटीच्या वर आरोग्याचं बजेट, मग या बजेटला कोण कुरतडत आहे? असा प्रश्न विचारतानाच हे पाप शिवसेनेचं असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केलाय.

विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी बुधवारी रुग्णाची भेटही घेतली होती. मात्र त्याच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर प्रशासनाला दोष देत त्यांनी रुग्णाला श्रद्धांजली वाहिली

संबंधित बातम्या :

बेशुद्ध पडलेल्या रुग्णाचे डोळे उंदरांनी कुरतडले, राजावाडी पालिका रुग्णालयातील गंभीर प्रकार

‘सामान्य माणसाचे डोळे उंदीर कुरतडतोय, तर शिवसेनेनं मुंबई महापालिकेलाच कुरतडलं’, आशिष शेलारांचा घणाघात

(Patient bitten by Rat in ICU of Rajawadi Hospital dies)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI