दवाखान्यात जायला निघाली ती परतलीच नाही… कारमध्ये रक्तच रक्त; मुंबईच्या महिला डॉक्टरसोबत सांगलीत काय घडलं ?
मुंबईतील डॉ. शुभांगी समीर वानखेडे यांनी सांगली जवळील इस्लामपूर येथे स्वतःच्या कारमध्ये आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्यांनी पुणे-बंगळुरू महामार्गावर कार थांबवून स्वतःच्या हाताच्या आणि गळ्याच्या नसा कापल्या. घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली. पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला असून, आत्महत्येमागील कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.

मुंबईत राहणाऱ्या एका महिला डॉक्टरने सांगलीजवळील इस्लामपूर येथे जाऊन तिच्याच कारमध्ये स्वतःला संपवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. डॉ. शुभांगी समीर वानखेडे असे मृत महिला डॉक्टरचं नाव असल्याची माहिती समोर आली असून यामुळे प्रचंड खळबळ माजली हे. शुभांगी यांनी पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाळवा तालुक्यातील विठ्ठलवाडी गावच्या हद्दीत रस्त्याकडेला कार थांबवली आणि मग त्यांनी स्वतःच्या हाताच्या आणि गळ्याच्या नसा ब्लेडने कापून घेत आयुष्य संपवलं. मंगळवारी रात्री 11च्या सुमारास हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि डॉक्टरला रुग्णालयात दाखल केलं. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता. त्यांचा मृत्यू झाला होता. या आत्महत्येमुळे मोठी खळबळ माजली असून इस्लामपूर पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
दवाखान्यात जाण्यासाठी निघाल्या पण घरी परत आल्याच नाहीत..
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. शुभांगी वानखेडे या मुलूंड पश्चिम येथील ईएसआयसी हॉस्पिटल क्वॉटर्समध्ये राहत होत्या. मंगळवारी सकाळी मी दवाखान्यात जाते असं सांगून त्या घरातून निघाल्या होत्या. त्यांचा मोबाइलही बंद होता. दवाखान्यात न जाता शुभांगी वानखडे या कोल्हापूरच्या दिशेने निघाल्या होत्या. मात्र विठ्ठलवाडी गावच्या पांढरावडा परिसरात त्यांची एमएच 03 एआर 1896 क्रमांकाची गाडी थांबली होती. या गाडीच्या मागेच त्यांनी स्वतःच्या डाव्या हाताच्या आणि गळ्याच्या नसा कापून घेतल्या होत्या. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्या बेशुद्ध अवस्थेत पडल्या होत्या. रात्री 11 च्या सुमारास माहिती मिळाल्यावर पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली.
मोटारीच्या पाठीमागे रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या..
रक्तबंबाळ झालेल्या शुभांगी वानखडे यांना पोलिसांनी उपचारासाठी इस्लामपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात नेऊन तपासताच तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर डॉ. शुभांगी यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. पोलिसांना शुभांगी यांची गाडी पुण्याच्या दिशेने असल्याचे दिसले. पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता त्यांना शुभांगी वानखेडेंचे ओळखपत्र मिळालं.
शुभांगी या मोटारीच्या पाठीमागे रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. त्यांच्या गळ्यावर, हातावर ब्लेडचे खोलवर वार होते. त्यांच्या हातातून, गळ्यातून मोठा रक्तस्राव झाला होता. पोलिसांनी शुभांगी यांच्या मोटारीची तपासणी केली असता मोटारीतही रक्ताचा सडा पडला होता. पोलिसांनी त्यांना यांना इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
दरम्यान या प्रकरणाची चौकशी निष्पक्ष, पारदर्शक आणि जलदगतीने व्हावी, अशी ठाम भूमिका विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांडली आहे. ही घटना केवळ एका महिला डॉक्टरच्या आत्महत्त्येपुरती मर्यादित न राहता, समाजात अशा दुर्दैवी घटनांना आळा बसण्यासाठी संबंधित यंत्रणांनी गंभीरतेने कार्यवाही करावी, असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे. शुभांगी यांच्या मृत्यूप्रकरणआची इस्लामपूर पोलीस कसून चौकशी करत आहेत. शुभांगी यांनी असं टोकाचं पाऊल का उचललं, त्यांन की समस्या होती का, याचा पोलिस कसून तपास करत आहे
