Mumbai Crime : लग्नाला जायचं म्हणून मुलीने सोन्याचे दागिने घालायला मागितले, दार उघडून पाहिलं तर झटकाच बसला !
एका लग्नसमारंभाला जाण्याच्या निमित्ताने मुलीने ते दागिने घालण्याची इच्छा व्यक्त केली. दागिने काढून घेण्यासाठी दार उघडले पण ते कुठेच सापडले नाहीत. बरीच शोधाशोध करूनही दागिन्यांचा पाऊच मिळालाच नाही.

मुंबई | 22 सप्टेंबर 2023 : मुलं जेव्हा मस्ती किंवा एखादी चूक करतात तेव्हा पहिल्यांदा आई-वडील त्यांना समजावून सांगतात. परत तशीच चूक झाली तर आणखी २-३ वेळा समजावून सांगतात. पण एखादी गंभीर चूक घडली तर मात्र त्यांचा कान पिळल्याशिवाय किंवा एखादा फटका दिल्याशिवाय मुलही ऐकत नाही. बघणाऱ्याला हे कितीही क्रूर वाटलं तरी मुलं चुकीच्या मार्गाला जाऊ नयेत यासाठी आई-वडिलांना मन घट्ट करावचं लागतं. नाहीतर पाय घसरायला वेळ लागत नाही.
अशाच एका कर्तव्यकठोर बापाची कहाणी समोर आली आहे, पण ती तितकीच दुर्दैवी देखील आहे. मुंबईत एका वडिलांनी त्यांच्या पोटच्या गोळ्याविरुद्ध, त्यांच्या मुलाविरुद्ध पोलिसांत तक्रार (file case in police) नोंदवली आहे. मुलाने साडेसात लाखांचे सोन्याचे दागिने (theft of gold ornaments ) चोरल्याचा आरोप त्यांनी त्याच्यावर लावला आहे. सहार पोलिस स्टेशन येथे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला .
एफआयआर नुसार, सेल्विन अरमादुराई (48) असे फिर्यादीचे नाव असून ते अंधेरू पूर्व येथे पत्नी व दोन मुलांसह राहातात. त्यांचा मुलगा एडिन जॉय (16), श्रीनिवास बगरगा महाविद्यालयात 11वीत शिकत आहे, तर त्यांची मुलगी 14 वर्षांची असून ती 9 वीत शिकत आहे. सेल्विन यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले आणि ही मुले त्याच्या पहिल्या लग्नापासून झाली आहेत. त्यानंतर त्यांनी जबा हिच्याशी दुसरे लग्न केले.
सेल्विन यांची बहीण त्यांच्या शेजारीच राहते. पहिल्या पत्नीचे आणि मुलांचे दागिने सेल्विन यांनी त्या बहिणीकडे ठेवायला दिले होते. मात्र तिला तामिळनाडू येथील गावी जायचे असल्याने तिने ते दागिने सेल्विनकडे परत दिले होते. त्यांनी ते सर्व दागिने प्लास्टिकच्या एका पाऊचमध्ये ठेवून घरातील बेडमध्ये नीट जपून ठेवले होते.सेल्विन यांच्या व्यतिरिक्त त्यांची पत्नी व बहीण या दोघींनाच ही जागा माहीत होती.
चोरी करून आरोपीने विकले दागिने
11 सप्टेंबर रोजी एका लग्नसमारंभाला जाण्याच्या निमित्ताने सेल्विन यांच्या मुलीने ते दागिने घालण्याची इच्छा व्यक्त केली. तोपर्यंत त्यांची पत्नी व बहीण गावावरून परत आले होते. त्यांनी दागिने काढून घेण्यासाठी घरातील त्या बेडचे दार उघडले पण तो दागिन्यांचा तो पाऊच कुठेच सापडला नाही. बरीच शोधाशोध करूनही तो मिळाला नाही. यामुळे त्या घाबरल्या आणि त्यांनी लगेचच सेल्विन यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर सेल्विन यांनी त्यांच्या मोठ्या मुलाकडे याबाबत विचारणा केली असता, त्याने दागिने चोरल्याचे कबूल केले. मित्रांबरोबर मजा मस्ती करण्यासाठी ते दागिने विकले आणि पैसे मिळवले अशेही त्याने सांगितले. दोन नेकलेस, दोन चेन्स, दोन बांगड्या , कानातल्यांची एक जोडी, सहा अंगठ्या, दोन ब्रेसलेट असे हे सोन्याचे दागिने सुमारे 7.40 लाख रुपयांचे आहेत असे समजते.
मुलाच्या या कबुलीमुळे व्यथित झालेल्या सेल्विन यांनी तातडीने सहार पोलिसांत धाव घेतली आणि स्वत:च्याच मुलाविरोधात चोरीची तक्रार दाखल केली. अद्याप सहार पोलिसांनी मुलाला अटक केली नसून, तपास सुरू असल्याचे सांगितले.