Sameer Wankhede : समीर वानखेडे यांना बांगलादेशमधून जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत तक्रार दाखल
ड्युटीवर असताना धमकीचा हा मेसेज वानखेडे यांना आला होता. त्याबद्दल मुंबई पोलिस आयुक्तांना कळवण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी हे प्रकरण तपासासाठी गोरेगाव पोलिसांकडे सुपूर्त केले.

मुंबई | 12 ऑक्टोबर 2023 : मुंबई: आयआरएसचे (IRS) अतिरिक्त आयुक्त समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ड्युटी बजावत असताना आपल्याला सोशल मीडिया साइटवर धमक्या आल्याचे त्यांनी नमूद केले. बांगलादेशमधून धमकीचाहा मेसेज आल्याचा दावाही त्यांनी केला. हे संपूर्ण प्रकरण बुधवारी उघडकीस आलं. याप्रकरणाबद्दल मुंबई पोलिस आयुक्तांना कळवण्यात आले होते, त्यांनी तपासासाठी हे प्रकरण गोरेगाव पोलिसांकडे सुपूर्द केले. समीर वानखेडे हे सध्या चेन्नई येथे ड्युटीवर आहेत.
याबाबत त्यांनी माध्यमांशी संवाद साधत आपल्या फोनवर एक धमकीचा मेसेज आला. आर्यन खान आणि त्याचे वडील शाहरुख खान यांच्या केसमध्ये असलेल्या सहभागाबद्दल सांगत, अज्ञात व्यक्तीने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली, असे वानखेडे यांनी नमूद केले. मुस्लिम नागरिक आणि त्यांच्या भावना (कथितरित्या) दुखावल्याचा आरोप करत (त्यांच्या) गटाकडून जीवे मारण्यात येईल, असा दावाही त्या मेसेजमध्ये करण्यात आला आहे. समीर वानखेडे हे सध्या चेन्नई येथे ड्युटीवर असून, (धमकीचा) हा मेसेज बांगलादेशमधील राजाशाही या शहरातून आल्याचा खुलासा त्यांनी केला.
पोलिसांना केला ईमेल
( धमकीचा) हा मेसेज मिळाल्यानंतर मी तातडीने मुंबई पोलिस आयुक्तांना ईमल पाठवला. आम्ही तो ( मेसेज पाठवणारा) नंबर ट्रेस करण्याचा प्रयत्न केला असता तो बांगलादेशमधून आल्याची माहिती समोर आली. तेथील कट्टरपंथीयांकडून तो आल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी भाजप आणि देशाबद्दलही टिपण्णी केली, असे वानखेडे यांनी नमूद केले. सध्या मी चेन्नईत ड्युटीवर असल्याने, या प्रकरणी मी पोलिसांकडे लेखी तक्रार केली आहे, असेही वानखेडे यांनी सांगितले
आर्यन खान संदर्भातील वाद काय होता ?
2021 मध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकला होता. त्या क्रूझवर ड्रग्ज पार्टी झाली, असा दावा एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी केला होता. या छाप्यात अनेकांना अटक केली. त्यामध्ये अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याचाही समावेश होतो. त्याचवेळी समीर वानखेडे हे मुंबई एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक होते. याप्रकरणी आर्यन खान हा जवळपास महिनाभर तुरुंगात होता. त्यानंतर जामिनावर त्याची सुटका झाली.
मात्र त्यानंतर काही काळाने समीर वानखेडे यांच्यावर खंडणी मागितल्याचा आरोप झाला. आर्यन खानच्या सुटकेसाठी वानखेडे यांनी आर्यनच्या कुटुंबियांकडून 25 कोटी रुपयांची लाच मागितली, असा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला होता.
