सात तासात 23 वेळा एकाच एटीएम कार्डचा वापर, मशीन हॅक करुन लाखो रुपये लंपास, सीसीटीव्हीत घटना कैद

नागपुरात एटीएम हॅक करणाऱ्या टोळीने एसबीआय बँकेच्या एटीएममधून लाखो रुपये लंपास केले आहेत (ATM loot gang hack ATM machine and stolen more than two lakh rupees in Nagpur).

सात तासात 23 वेळा एकाच एटीएम कार्डचा वापर, मशीन हॅक करुन लाखो रुपये लंपास, सीसीटीव्हीत घटना कैद
सात तासात 23 वेळा एकाच एटीएम कार्डचा वापर, मशीन हॅक करुन लाखो रुपये लंपास, सीसीटीव्हीत घटना कैद

नागपूर : नागपुरात एटीएम हॅक करणाऱ्या टोळीने एसबीआय बँकेच्या एटीएममधून लाखो रुपये लंपास केले आहेत. या टोळीने दोन दिवसात पाच ठिकाणी एटीएम मशीनला हॅक करुन पैसे लंपास केले आहेत. एटीएम मशीनमध्ये पैसे भरण्यासाठी अधिकारी गेले तेव्हा संबंधित प्रकार त्यांच्या लक्षात आला. पोलिसांनी या घटनेचा तपास केला असता या घटनेचा सोक्षमोक्ष लागला. मात्र, याप्रकरणी अजून एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांचा सध्या शोध सुरु आहे. तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे चोरट्यांचा शोध सुरु आहे (ATM loot gang hack ATM machine and stolen more than two lakh rupees in Nagpur).

नेमकं काय घडलं?

नागपूरच्या बजाजनगर पोलीस स्टेशन हद्दीतील व्हीएनआयटीत एसबीआयची शाखा आहे. एका अज्ञात आरोपीने 14 जूनला एकाच एटीएम कार्डचा 23 वेळा वापर करुन 2.30 लाख रुपये काढले. प्रत्येक वेळी एटीएममधून रोख रक्कम निघाल्यानंतरही ट्रान्झेक्शन फेल असं येत होतं. त्यानंतर 15 जून रोजी एटीएममध्ये रोख रक्कम जमा करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना 2.30 लाख रुपयांचा फरक जाणवला. अखेर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली (ATM loot gang hack ATM machine and stolen more than two lakh rupees in Nagpur).

आरोपींविरोधात गुन्हा दाखल

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणी तपासणी केली असता एटीएमच्या सीसीटीव्हीमध्ये संशयास्पद व्यक्ती आढळून आले. त्यांनी 14 जूनला सकाळी साडेनऊ वाजेपासून दुपारी तीन वाजेपर्यंत 23 वेळा ट्रांझेक्शन केले होते. आरोपी ट्रांझेक्शन करताना पैसे निघण्याच्या ठिकाणी हात ठेवायचे. त्यामुळे पैसे निघत असल्याचे दिसून येत नव्हते. याप्रकरणी अज्ञात अरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरु आहे.

पुण्यात एटीएम फोडणारे गजाआड

पुणे जिल्ह्यातील भोसरी परिसरातील पांजरपोळ येथील ‘एसबीआय’च्या एटीएममध्ये चोरी झाली होती. एटीएम गॅस कटरने कापून मशीनमधून पैसे ठेवण्याच्या ट्रेसह 22 लाख 95 हजार 600 रुपयांची रोकड पळवण्यात आली होती. हा प्रकार 10 जून रोजी सकाळी उघडकीस आला होता.

हरियाणामधून टोळीला अटक

या टोळीला भोसरी पोलिसांनी हरियाणामधून अटक केली. अकरम दीनमोहम्मद खान, शौकीन अक्तर खान, अरसद आसमोहम्मद खान उर्फ सोहेब अख्तर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचे आणखी तीन साथीदार पसार आहेत. भोसरी पोलीस त्यांचा शोध घेत आहेत

अटक केलेल्या आरोपींकडून चोरलेल्या रकमेपैकी 6 लाख 24 हजार 500 रुपये रोकड, गुन्हा करताना वापरलेला ट्रक, गॅस कटर, घरगुती वापराची एक गॅस टाकी, मेडिकल वापराचे दोन ऑक्सिजन सिलेंडर, एटीएममधील पैसे ठेवण्याचे तीन ट्रे, दोन कोयते, तीन मोबाईल फोन असा एकूण 26 लाख 33 हजार 360 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

हरियाणातील आणखी एक टोळी

याआधीही महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश येथे एटीएम मशीनमधील लाखो रुपये चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात आला होता. या प्रकरणी गेल्या वर्षी दोघांना हरियाणामधूनच अटक करण्यात आली होती.

संबंधित बातम्या :

एटीएममधून लाखो रुपयांची चोरी, आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश, दोघांना हरियाणातून अटक

ATM Money Theft | बनावट एटीएम कार्डच्या सहाय्याने चोरी, आंतरराज्य टोळीतील दोघे गजाआड