नाशिकच्या जवानाला नेपाळ सीमेवर वीरमरण, हायव्होल्टेज तारांचा झटका, 30 वर्षीय अमोल पाटीलसह तिघे गतप्राण

बिहारमधील नेपाळ सीमेलगत बिरपूर येथे शुक्रवारी सशस्त्र सीमा बलाच्या 45 व्या बटालियनच्या कॅम्पमध्ये प्रशिक्षणार्थी सैनिकांचे प्रशिक्षण सुरु होते. यावेळी 11 केव्ही उच्चदाब प्रवाहाच्या तारेचा धक्का लागल्याने तिघा जवानांचा मृत्यू झाला.

नाशिकच्या जवानाला नेपाळ सीमेवर वीरमरण, हायव्होल्टेज तारांचा झटका, 30 वर्षीय अमोल पाटीलसह तिघे गतप्राण
नाशिकचे जवान अमोल पाटील

नाशिक : नाशिकमधील जवानाला नेपाळ सीमेवर वीरमरण (Nashik Soldier Martyr) आल्याची दुःखद घटना समोर आली आहे. कर्तव्यावर असताना उच्चदाब प्रवाहाचा विजेच्या तारेचा धक्का लागल्याने तिघा सैनिकांची प्राणज्योत मालवली. यापैकी अमोल हिंमतराव पाटील (Amol Patil) असं महाराष्ट्रातील 30 वर्षीय जवानाचं नाव आहे. ते नाशिक जिल्ह्यातील नांदगांव तालुक्यातील रहिवासी होते. बिहारमधील नेपाळ सीमेलगत बिरपूर येथे शुक्रवारी हा प्रकार घडला. वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी त्यांच्यावर काळाने घाला घातल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अमोल यांच्या पश्चात पत्नी, सहा महिन्यांची मुलगी, आई, अविवाहित भाऊ असा परिवार आहे. अमोल पाटील यांच्या निधनाने कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

नेमकं काय घडलं?

बिहारमधील नेपाळ सीमेलगत बिरपूर येथे शुक्रवारी (14 जानेवारी) सशस्त्र सीमा बलाच्या 45 व्या बटालियनच्या कॅम्पमध्ये प्रशिक्षणार्थी सैनिकांचे प्रशिक्षण सुरु होते. यावेळी 11 केव्ही उच्चदाब प्रवाहाच्या तारेचा धक्का लागल्याने तिघा जवानांचा मृत्यू झाला. त्यात बोलठाण (ता. नांदगाव, जि. नाशिक) येथील अमोल हिंमतराव पाटील (वय 30) यांचा समावेश आहे.

या घटनेत एकूण दहा जण जखमी झाले. त्यांना बिरपूरच्या ललित नारायण उपविभागीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. चौघा गंभीर जवानांना दरभंगा मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले आहे.

उच्चदाब प्रवाहाच्या तारांकडे दुर्लक्ष

प्रशिक्षण मैदानावरील उच्चदाब प्रवाहाच्या तारा आणि खांब काढण्यासाठी सीमा सुरक्षा बलाने संबंधित वीज विभागाला अनेकदा पत्रे लिहिली होती. मात्र वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळीच योग्य ती दखल न घेतल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचं बोललं जात आहे.

सशस्त्र सीमाबलाच्या बिहार-नेपाळ येथील सुपौलच्या बिरपूर सीमेवर कार्यरत असलेले अमोल पाटील सहकाऱ्यांसोबत सीमेवर तैनात होते. ऐन तारुण्यात अपघातात जखमी झालेले असतानाही केवळ जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अमोल यांची सहा वर्षांपूर्वी सशस्त्र सीमा दलात निवड झाली होती.

चिमुकलीच्या जन्माचा आनंद

दिवाळीत अमोल पाटील बोलठाणमधील आपल्या गावी सुट्टीवर आले होते. मुलगी झाल्याचा आनंदही त्यांनी गावात साजरा केला होता. जाताना आई, पत्नी आणि आपल्या चिमुकलीला तो सोबत घेऊन गेला होता. लहान वयातच वडिलांचे छत्र हरपलेल्या अमोल यांच्या पश्चात पत्नी, सहा महिन्यांची मुलगी, आई, अविवाहित भाऊ असा परिवार आहे.

अमोल पाटील यांचे पार्थिव बोलठाण येथे आणण्यात येणार असून, केंद्र आणि राज्य सरकार यांच्या कोविड नियमांच्या अधीन राहून त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, असी माहिती तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांनी दिली. अमोल यांच्या मृत्यूची बातमी समजताच बोलठाणसह नांदगाव तालुक्यावर शोककळा पसरली.

संबंधित बातम्या :

जम्मू-काश्मीर : लष्कराच्या तळाची बॅरेक कोसळली; दोन जवान शहीद

‘पारु’ पोरकी झाली! पारंपरिक कोळीगीतांचा बादशाह हरपला, काशीराम चिंचय कालवश

पुणेकरांनो हा एक फोटो लक्षात ठेवा, मदत करा, 4 वर्षाच्या मुलाचं अपहरण, आ. महेश लांडगेंकडून अपहरणकर्त्याचे फोटो जारी

Published On - 9:10 am, Sat, 15 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI