खून नवी मुंबईत, आरोपी बांगलादेशात, तरीही मुसक्या आवळल्या, कशा?

रीना ही आपल्या दोन मैत्रिणींसोबत कळंबोली येथील फ्लॅटमध्ये राहत होती. तिच्या दोन्ही मैत्रिणीही बांगलादेशी होत्या. | Navi Mumbai girl Murder

खून नवी मुंबईत, आरोपी बांगलादेशात, तरीही मुसक्या आवळल्या, कशा?

नवी मुंबई: कळंबोलीतील लिपी सागर शेख उर्फ रीना शेख या बांगलादेशी तरुणीच्या हत्याप्रकरणातील (Murder) रंजक माहिती आता समोर आली आहे. रीना शेख ही तरुणी बारबाला असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. रीना शेख हिचे बाहेर अनैतिक संबंध असल्याचे समजल्यानंतर प्रियकराने तिची हत्या केली होती. त्यानंतर हा प्रियकर बांगलादेशात पळून गेला होता. मात्र, नवी मुंबई पोलिसांच्या हुशारीमुळे या बांगलादेशी तरुणाला अटक करण्यात यश मिळाले. (Navi Mumbai 26 yr old woman murdered by boyfriend)

काय आहे नेमके प्रकरण?

रीना ही आपल्या दोन मैत्रिणींसोबत कळंबोली येथील फ्लॅटमध्ये राहत होती. तिच्या दोन्ही मैत्रिणीही बांगलादेशी होत्या. लॉकडाऊनच्या काळात या तिघींच्या नोकऱ्या गेल्याने त्या बेरोजगार होत्या. तेव्हा रीनाच्या दोन्ही मैत्रिणी बांगलादेशला परतल्या होत्या. तेव्हापासून रीना फ्लॅटमध्ये एकटीच राहत होती.

काही दिवसांपूर्वी रीनाच्या मैत्रिणी नोकरीसाठी नवी मुंबईत परतल्या. तेव्हा फ्लॅट बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. रीनाला अनेक फोन करूनही तिने उत्तर दिले नाही. त्यानंतर रीनाच्या मैत्रिणींनी फ्लॅटच्या मालकाला फोन करून त्याच्याकडून फ्लॅटची चावी मागून घेतली. तेव्हा घरमालकाने रीना अजूनही फ्लॅटमध्येच राहत असल्याचे सांगत चावी तिच्याकडेच असल्याचे म्हटले. मात्र, रीनाचा पत्ता लागत नसल्यामुळे अखेर घरमालकाने डुप्लिकेट चावीच्या साहाय्याने फ्लॅट उघडला. तेव्हा रीनाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.

पोलिसांनी रीनाच्या प्रियकराला कसे पकडले?

रीनाची हत्या करून तिचा प्रियकर बांगलादेशमधील आपल्या गावी पळून गेला होता. त्यामुळे त्याला पकडणे अवघड होऊन बसले. तेव्हा कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी एक शक्कल लढवली. त्यांनी आरोपीच्या एका मित्राला गाठले. या मित्राने रीनाच्या प्रियकराला मुंबईत चांगली नोकरी असल्याचे सांगून मुंब्रा येथे बोलावून घेतले. आरोपी मुंब्र्यात आल्यानंतर पोलिसांनी त्याला अलगदपणे ताब्यात घेतले.

त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने रीना हिचे अनेक पुरुषांशी अनैतिक संबंध असल्याचा खुलासा केला. याचा राग मनात धरून खून केल्याची कबुली रीनाच्या प्रियकराने दिली. कळंबोली पोलिसांनी या 24 वर्षीय तरुणास ताब्यात घेतले असून त्याला न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Navi Mumbai 26 yr old woman murdered by boyfriend

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI