18 वर्ष वय पूर्ण होण्यासाठी 56 तास शिल्लक असतानाच प्रॉपर्टी डिलरला संपवलं, भयानक हत्याकांडानं पोलीसही हादरले
दिल्लीच्या मालवीय नगरमध्ये एका 56 वर्षांच्या प्रॉपर्टी डिलरची हत्या झाली होती, या प्रकरणात आता पोलिसांनी एका व्यक्तीला आणि त्याच्या मुलाला अटक केली आहे, घटना समोर येताच पोलिसांनाही धक्का बसला आहे.

दिल्लीच्या मालवीय नगरमध्ये एका 56 वर्षांच्या प्रॉपर्टी डिलरची हत्या झाली होती, या प्रकरणात आता पोलिसांनी एका व्यक्तीला आणि त्याच्या मुलाला अटक केली आहे. या प्रकरणातील आरोपी असलेला मुलगा अल्पवयीन आहे. विशेष म्हणजे या मुलानं त्याचं वय 18 वर्ष पूर्ण होण्यासाठी अवघे 56 तास शिल्लक असताना ही हत्या केली आहे. आता या मुलावर अल्पवयीन म्हणून खटला दाखल होणार की प्रौढ म्हणून खटला चालवण्यात येणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
घटनेबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, लखपत सिंह असं हत्या झालेल्या प्रॉपर्टी डिलरचं नाव आहे, ते दिल्लीमधल्या बेगमपूर येथील रहिवासी आहेत. विजय मंडल पार्क परिसरात त्यांच्यावर बॅटने हल्ला करण्यात आला होता, सकाळी ते मॉर्निंग वॉकला निघाले असताना त्यांच्यावर हल्ला झाला.त्यानंतर आरोपी असलेले वडील आणि मुलानं त्यांच्यावर बंदूकीनं गोळ्या झाडल्या, या घटनेत ते गंभीर जखमी झाले होते, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषीत केलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या अनेक दिवसांपासून हे दोनही आरोपी लखपत सिंह यांच्यावर बारीक लक्ष ठेवून होते, ते दररोज मॉर्निंग वॉकला घराबाहेर पडतात हे त्यांना माहीत होतं, हीच वेळ साधत त्यांनी आधी त्यांच्यावर बॅटने हल्ला केला त्यानंतर त्यांना गोळ्या घातल्या. या घटनेत लखपत सिंह यांचा मृत्यू झाला. या घटनेत आरोपी असलेल्या वडिलांनी मुद्दामहून आपला मुलगा 18 वर्षांचा पूर्ण होण्यासाठी 56 तास बाकी असताना हा प्लॅन रचल्याचा पोलिसांना संशय आहे. या मुलानं 18 वर्षपूर्ण होण्यापूर्वीच ही हत्या केल्यानं हा खटला अल्पवयीन म्हणून चालवण्यात येईल असं आरोपीचा प्लॅन होता.
650 CCTV कॅमेऱ्यांची मदत
दरम्यान पोलिसांनी या घटनेतील आरोपींना पकडण्यासाठी तब्बल 650 सीसीटीव्हीची मदत घेतली आहे, सीटीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीनं या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये, मात्र जुन्या दुश्मनीतून ही हत्या झाल्याचं बोललं जात आहे.
