पुण्यात वडगाव शेरीमध्ये खळबळ, विश्व्या कुठंय विचारलं अन् टोळक्याचा तरूणांवर हल्ला
Pune Crime News : विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्याची ओळख आता बदलू लागली आहे. गुन्हेगारीच्या घटनांमध्येही वाढ होताना दिसत असलेली पाहायला मिळत आहे. अशातच पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून पुणे चर्चेत राहत असलेलं पाहायला मिळत आहे. पुण्यामध्ये घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. हिट अँड रन प्रकरणानंतर एफसी रोडवरील एका क्लबमध्ये तरूण-तरूणी ड्रग्ज घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. अशातच पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यात दोन तरुणांवर आठ ते दहा जणांच्या टोळक्याने कोयत्याने हल्ला केला.
मिळालेल्या माहितीनुसार हा सगळा प्रकार वडगाव शेरी भागातील सत्यम सेरेनिटी मध्ये मंगळवारी रात्री 11.30 वाजता घडला. फिर्यादी हे त्यांच्या चार ते पाच मित्रासोबत गप्पा मारत बसले होते. अचानकपणे चार ते पाच मोटरसायकल वरून आठ ते १० जणं त्याठिकाणी आले आणि त्यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली.
“विश्व्या कुठे आहे?” असे म्हणुन त्या टोळक्याने फिर्यादी यांना “विश्वजीत बरोबर का राहतो? जिवंत सोडणार नाही”, असे म्हणुन फिर्यादी यांच्यावर कोयता उगारला. तो घाव वाचवण्यासाठी फिर्यादी यांच्या मित्राने त्यांचा हाथ मध्ये घातला असता त्यांच्यावर वार पडले. या हल्ल्यात फिर्यादी यांच्यासह 19 वर्षीय तरुण जखमी झाला आहे. या घटनेला 24 तासांपेक्षा अधिक काळ उलटून गेला असून सुद्धा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेले नाही.
कँप परिसरात न्यूयॉर्क वाईन शॉपची तोडफोड
कँप परिसरामध्ये न्यूयॉर्क वाईन शॉपची रात्री आठ ते साडे आठच्या सुमारास हातात कोयते घेऊन काही तरूणांनी तोडफोड केली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल आहे.