संपूर्ण पुण्याला हादरवणारी घटना, आधी बारमालकाला बेदम चोपलं, नंतर पाठलाग करत पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न
पुण्यात गुन्हेगारी वाढत असून अलिकडच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. नुकताच एका बार मालकावर झालेल्या हल्ल्यात त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी आरोपी अद्याप पकडले गेले नाहीत.

गेल्या काही दिवसांपासून पुणे सतत चर्चेत आहे. कधी कोयता गँगचा उच्छाद तर कधी महिलांवरील अत्याचाराच्या घटनेने पुणे हादरले आहे. काल एका महिलेवर शिवशाही बसमध्ये एकदा नव्हे तर दोनदा बलात्कार झाल्याची घटना घडली. तर आज एका दीरानेच वहिनीचा अंघोळ करतानाच अश्लील व्हिडीओ काढला. त्या आधी 21 फेब्रुवारी रोजी एका टॅक्सी चालकाने महिलेसमोरच हस्तमैथून केल्याने संपूर्ण शहरच हादरून गेलं आहे. या घटना ताज्या असतानाच आता आणखी एक घटना समोर आली आहे. काही गुंडांनी एका बार मालकाला बेदम मारहाण करत त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे पुण्यात दहशतीचं वातावरण आहे. तर पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक बारच्या बाहेर एक ग्रुप उपद्रव करत होता. हे टोळकं बारच्या बाहेर बसून गोंधळ घालत होतं. त्यामुळे बार मालकाने त्यांना तिथून जायला सांगितलं. त्यामुळे या तरुणांचं माथंच फिरलं. त्यांनी थेट बार मालकावर हल्ला चढवला. त्या गुंडांनी बार मालकाला बेदम चोप दिला. त्यामुळे बार मालक गंभीर जखमी झाला आहे.
पाठलाग करून पेट्रोल ओतलं
या हल्ल्यात जखमी झालेला बार मालक उपचार घेण्यासाठी रुग्णालयात जात होता. त्यावेळी या गुंडांनी बारमालकाचा पाठलाग करत त्याला रस्त्यात अडवलं. त्यानंतर पुन्हा त्याला बेदम चोप दिला. हे गुंड इतक्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी या बारमालकाच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. सुदैवाची गोष्ट म्हणजे घटनास्थळी असलेल्या लोकांनी लगेचच धाव घेऊन त्याला रुग्णालयात नेलं. त्यामुळे त्याचे प्राण वाचले.
कुणालाच अटक नाही
या मारहाणीत बार मालक गंभीर जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेत आहेत. या हाणामारीतील आरोपींची ओळख पटली आहे. त्यांना लवकरच अटक केली जाईल, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
आरोपींचा शोध सुरू
भर रस्त्यात घडलेल्या या प्रकारामुळे लोकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या आरोपींवर तात्काळ कारवाई झाली नाही तर आरोपींची हिंमत वाढेल. त्यामुळे गुन्ह्यांचं प्रमाण वाढेल असं लोकांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे पोलीस आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज चेक करत असून आरोपींचा शोध घेत आहेत.
