मोठी बातमी! डॉ. वळसंगकर आत्महत्याप्रकरणात महिलेचं नाव; सुसाईड नोटमधून समोर आली धक्कादायक माहिती!
डॉ. शिरीश वळसंगकर यांच्या आत्महत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. ते सोलापुरातील प्रख्यात मेंदूविकार तज्ज्ञ होते. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण काय? असे विचारले जात होते.

Dr. Shirish valsangkar suicide Case : डॉ. शिरीश वळसंगकर यांच्या आत्महत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. ते सोलापुरातील प्रख्यात मेंदूविकार तज्ज्ञ होते. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण काय? असे विचारले जात होते. दरम्यान, आता या आत्महत्या प्रकरणात एका महिलेचे नाव समोर आले आहे. मनिषा माने या महिलेने डॉ. वळसंगकर यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप असून या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आता या महिलेला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणात मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.
आत्महत्येपूर्वी लिहिली एक चिठ्ठी
डॉ. वळसंगकर आत्महत्येप्रकरणी मनीषा माने या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतले असून तिला सोलापूर न्यायालयात हजर करण्यात आले. मनीषा माने ही महिला वळसंगकर यांच्या रुग्णालयात प्रशासकीय अधिकारी म्हणून नोकरीवर होती. आत्महत्या करण्यापूर्वी डॉ. वळसंगकर यांनी एक चिठ्ठी लिहिली होती. या चिठ्ठीत मनीषा मुसळे-माने हिच्यामुळेच मी टोकाचे पाऊल उचलत आहे, असे नमूद करण्यात आले आहे.
रात्रीच मनीषा माने हिला केली अटक
या सुसाईड नोटच्या आधारावरच 19 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास पोलिसांनी डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर रात्रीच न्यायालयाची परवानगी घेऊन पोलिसांनी मनीषा माने हिला अटक केली होती.
तीन दिवसांची पोलीस कोठडी
अटकेनंतर पोलिसांनी मनीषा माने हिला सोलापूर सत्र आणि दिवाणी न्यायालयासमोर हजर केले. सदर बझारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी 3 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. त्यानंतर दोन्ही बाजूचा युक्तिवाद लक्षात घेऊन न्यायाधीशांनी मनीषा माने हिला पोलीस कोठडी सुनावली आहे.
इतर महत्त्वाच्या बाबी उघड होण्याची शक्यता
दरम्यान, आता आरोपी मनीषा माने हिच्यासोबत या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा तपास पोलीस करणार आहेत. मनीषा माने हिच्या चौकशीतून डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्येच्या इतर काही बाबी उघड होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.