आईची हत्या, तिच्या शरीराचे अवयव शिजवून खाल्ले; मुंबई हायकोर्ट म्हणालं, ‘कसायाच्या कृतीशीही तुलना होऊ शकत नाही’
काही घटना या सुन्न करणाऱ्या असतात. त्या घटना अशा घडूच कशा शकतात? असा प्रश्न आपल्या मनात निर्माण करणाऱ्या असतात. कारण कोल्हापुरातील घटनादेखील तशीच आहे. ज्या आईने 9 महिने पोटात वाढवलं, जिने जन्म दिला त्याच आईला तिच्या वयाच्या 63 व्या वर्षी नराधम मुलाने संपवलं. आरोपीने आईची फक्त हत्या केली नाही तर तिच्या शरीराचे लचके तोडले. तिच्या शरीराचे मेंदू, लिव्हर, किडनी सारख्या अवयवांना ताव्यावर फ्राय करुन खाल्लं.
आईची हत्या करुन तिच्या शरीराचे लचके तोडणाऱ्या आणि शरीराचे मेंदू, लिव्हर, किडनी सारखे अवयवांना तेल, मीठ आणि मिरची लावून फ्राय करुन खाणाऱ्या नराधमाची फाशीची शिक्षा मुंबई हायकोर्टाने कायम ठेवली आहे. कोल्हापूरच्या माकडवाला परिसरात 2017 मध्ये ही घटना घडली होती. या घटनेनंतर 2021 मध्ये कोल्हापूर सत्र न्यायालयाने आरोपी सुनील कुचकोरवी याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. पण या शिक्षेला आरोपीने मुंबई हायकोर्टात आव्हान दिलं होतं. या प्रकरणी मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी मुंबई हायकोर्टाने आरोपीने केलेल्या कृत्याची एखाद्या कसायाच्या कृतीशीही तुलना केली जाऊ शकत नाही असं निरीक्षण नोंदवलं. आरोपीने त्याच्या आईसोबत केलेलं कृत्य हे आईसोबत केलेला विश्वासघात या शब्दातही वर्णन केले जाऊ शकत नाही. कारण त्याने केलेलं कृत्य पाहता हा शब्द फारच छोटा आहे, असंदेखील कोर्टाने म्हटलं. यावेळी कोर्टाने त्याला देण्यात आलेली फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे.
नेमकी घटना काय?
कोल्हापूरच्या माकडवाला परिसरात एक 63 वर्षीय महिला आपल्या दोन तरुण मुलांसोबत राहत होती. या महिलेचं नाव यल्लावा असं नाव होतं. यल्लावाच्या मोठ्या मुलाचं नाव राजू तर धाकट्या मुलाचं नाव सुनील असं होतं. यल्लावा ही फुगे, कंगवे, पिना विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत होती. यल्लावाचा धाटका मुलगा सुनील हा दारुच्या आहारी गेला होता. तो कामधंदा करायचा नाहीच, या व्यतिरिक्त तो आईकडे दारु पिण्यासाठी पैशांचा तगादा लावायचा. यावरुन सुनील आणि यल्लावा यांच्यात भांडण व्हायचं. यल्लावा मुलगा सुधारावा यासाठी त्याला नेहमी टोकत राहायची. पण तिच्या ममत्वाचा अर्थ नराधम मुलाला कधी कळलाच नाही.
28 ऑगस्ट 2017 दिवस होता. यल्लावा फुगे, कंगवे विकून रात्री दहाच्या सुमारास घरी आली होती. यावेळी सुनीलने तिच्याकडे पैशांची मागणी केली. यावेळी यल्लावाने पैसे देण्यास नकार दिला. यावरुन दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. यावेळी सुनीलला आपल्या आईच्या बोलण्याचा एवढा राग आला की, त्याने आपल्या आईचा धारधार चाकूने खून केला. सुनील एवढ्यावरच थांबला नाही. त्याने कूकृत्यांची अक्षरश: परिसिमा गाठली.
सुनीलने आपल्या आईच्या डोक्यावर वार करत आधी मेंदू काढला. त्यानंतर त्याने आईचे हृदय, किडनी, लिव्हर सारखे अनेक अवयव बाहेर काढले. यानंतर नराधम सुनीलने मेंदू, लिव्हर, किडनी या अवयवांना मीठ, तेल आणि मिरची पावडर लावून ताव्यावर फ्राय केलं आणि नंतर ते खाल्लंदेखील. हा सर्व प्रकार शेजाऱ्यांना लक्षात आला. यानंतर आजूबाजूच्या इतर नागरिकांनाही संबंधित प्रकार माहिती पडला. त्या लोकांच्या अक्षरश: पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा आरोपी सुनील हा आपल्या आईचे हृदय फ्राय करुन खाण्याच्या बेतात होता. पोलिसांनी त्याला रंगेहात पकडले. पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात नेले. यावेळी आरोपीने आपला गुन्हा कबूल केला. याप्रकरणी कोल्हापूर सत्र न्यायालयात अनेक दिवस सुनावणी पार पडली. जवळपास 12 जणांची साक्ष नोंदवण्यात आली. यानंतर आरोपीला 2021 मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
मुंबई हायकोर्टाने काय-काय निरीक्षण नोंदवलं?
कोल्हापूर सत्र न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आलं होतं. या प्रकरणी मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. यावेळी आरोपी येरवडा जेलमधून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर होता. यावेळी कोर्टाने काही महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले.
मुंबई हायकोर्टाने नोंदवलेले निरीक्षण पुढीलप्रमाणे :
- आरोपी सुनील कोंचीकोरवीने केलेला गुन्हा अत्यंत गंभीर तो सुधारण्यासारखा नाही, त्यामुळे आरोपी समाजात राहू शकत नाही
- संबंधित प्रकरण हे नरभक्षणाचं प्रकरण आहे. त्यामुळे आरोपीला सुधारणा करण्यासाठी वाव नाही. तो सुधारण्यासारखा नाही
- हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ आहे आणि आरोपीला जन्मठेपाची शिक्षा दिली तरी तो जेलमध्ये राहूनही असा गुन्हा करु शकतो. कारण आरोपीने स्वत:च्या आईची हत्या करुन तिचा मेंदू, लीवर आणि इतर अवयवांना शिजवून खाल्लं होतं. आरोपीने आपल्या आईच्या बरगड्या शिजवल्या होत्या आणि तिचं हृदयही तो शिजवणार होता. हे नरभक्षणाचं प्रकरण आहे. आरोपीत सुधारण्याची कोणतीही शक्यता नाही.
- आरोपीने केलेल्या कृत्याची एखाद्या कसायाच्या कृतीशीही तुलना केली जाऊ शकत नाही
- आरोपीने त्याच्या आईसोबत केलेलं कृत्य हे आईसोबत केलेला विश्वासघात या शब्दातही वर्णन केले जाऊ शकत नाही. कारण त्याने केलेलं कृत्य पाहता हा शब्द फारच छोटा आहे