कोलकाता : देशासह जगावर गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचं सावट आहे. या संकट काळात जगभरात लाखो लोकांचा मृत्यू झाला. भारतातही कोरोना प्रचंड फोफावला. या काळात केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारकडून संसर्ग कमी करण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी घरी राहणं पसंत केलं. पण या काळात इस्लामिक स्टेट ही अतिरेकी संघटना भारतात आपलं जाळं वाढवत होती, अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. लॉकडाऊन आणि त्यानंतर आलेल्या बेरोजगारीचा फायदा घेऊन जेएमबी, अंसारुल्लाह गुट आणि आयएस या अतिरेकी संघटना देशातील तरुणांना भडकवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आली आहे.
कोलकाता पोलिसांनी काही दिवसांपूर्वी दक्षिण किनाऱ्यावरील हरिदेबपूर येथून तीन संशयितांना बेड्या ठोकल्या होत्या. पुढे चौकशी केली असता ते जेएमबी या अतिरेकी संघटनांचे संचालक असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. या अतिरेक्यांची नजीउर रहमान पावेल, मेकैल खान आणि रबीउल इस्लाम अशी नावे आहेत. या तीनही अतिरेक्यांनी योग्य संधी साधत बांगलादेशातून भारतात घुसखोरी केली होती. विशेष म्हणजे ते कोलकात्यातील एका हायप्रोफाईल भागात राहत होते, अशी देखील माहिती त्यांच्या चौकशीतून समोर आली.
भारतात घुसरखोरी करुन हायप्रोफाईल परिसरात राहणारे अतिरेकी हे देशातील बेरोजगार तरुण-तरुणांना हेरायचे. ते त्यांचे ब्रेनवॉश करायचे. विशेष म्हणजे ते प्रत्यक्ष भेटून किंवा ऑनलाईन चॅट करुनही तरुण-तरुणींचे ब्रेनवॉश करायचे. त्यानंतर ते या तरुणांची अतिरेकी संघटनेत भरती करायचे. या गोष्टीवर अधिकाऱ्यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे.
दुसरीकडे इस्लामिक स्टेट ही संघटना भारतात जाळ वाढवण्यासाठी सर्वोतोपरी कट आखत आहे. या संघटनेने भारतातील 12 राज्यातील तरुणांना आपल्याकडे आकर्षित केल्याचा दावा केला आहे. या संघटनेचे लष्कर-ए-तोयबा आणि अल-कायदा सारख्या संघटनांशी संबंध आहेत. भारतात आपली विचारधारा पसरविण्यासाठी या अतिरेकी संघटना सोशल मीडियाचा प्रचंड वापर करत आहेत.
भारतात घुसखोरी केलेल्या अतिरेक्यांना आपली ओळख लपविण्यासाठी लग्न हे सोपं माध्यम आहे. या माध्यमातून त्यांना भारताचा नागरिक असल्याचं सिद्ध करण्यासाठी मोठी मदत होते. तसेच स्थानिक पातळीवर रुळण्यास मदत होते. त्यामुळे लग्न हे त्यांचं एकप्रकारे सुरक्षा कवच बनतं.
आरोपी इतके हुशार असतात की ते आपली ओळख लपवण्यासाठी धर्म परिवर्तनही करतात. कोलकाता पोलिसांनी पकडलेला अतिरेकी पावेल याने याच माध्यमातून आपली ओळख लपवली होती. त्याचं जयराम बेपारी असं हिंदू नाव आहे. त्याने आणि त्याचा सहकारी मेकैल खान उर्फ शेख शब्बीर यांनी हरिदेवपूर भागातील दोन महिलांसोबत मैत्री केली. त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्यानंतर पुढच्या महिन्यात लग्नाची योजना बनवली.
हेही वाचा :
सुरक्षा कंत्राटदाराने महिलांना छळलं, मनसेने भर रस्त्यात चोपचोप चोपलं !