Thane Crime : गुंतवणूकीवर जास्त पैसे मिळवण्याचे आमिष दाखवत व्यापाऱ्याला ४८ लाखांना गंडवले, चौघांविरोधात गुन्हा दाखल
एका व्यावसायिकाची ४८ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ४९ वर्षीय पीडित इसमाने नोंदवलेल्या तक्रारीवरून नौपाडा पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

ठाणे | 30 सप्टेंबर 2023 : ट्रेडिंग कंपनीत गुंतवणूक करा, चांगला परतावा मिळेल ( higher return on investment) असे आमिष दाखवत एका बिझनेसमनची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्यापाऱ्याची एकूण ४८ लाख रुपयांची फसवणूक (fraud) करण्यात आली. ठाण्यातील ४९ वर्षीय पीडित इसमाने तक्रार नोंदवल्यानंतर त्या आधारे गुरुवारी नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले.
“डिसेंबर 2020 ते जानेवारी 2021 दरम्यान, आरोपींनी व्यावसायिकाला आमिष दाखवले. आमच्या ट्रेडिंग कंपनीत गुंतवणूक केलीत तर चांगला परतावा मिळेल, असे आश्वासनही त्यांनी दिले. त्याला भुलून पीडित इसमाने त्यांच्या कंपनीत पीडितेने त्यात 57 लाख रुपये गुंतवले. काही ताळानंतर तो आरोपींकडे सततया पाठपुरावा करू लागला, अखेर आरोपींनी त्याला फक्त 9 लाख रुपये परत दिले. मात्र त्यांनी गुंतवलेली इतर रक्कम, बाकीचे 48 लाख रुपये तसेच त्या गुंतवणुकीवरील परतावा हे त्यांना कधीच परत मिळाले नाहीत, असे पोलिसांनी सांगितले.
आरोपींनी आपली फसवणूक केल्याचे लक्षात येताच पीडित व्यावसायिकाने पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली, असे एका अधिकाऱ्याने नमूद केले. जसमीत सिंग, शर्मीन अन्सारी, संदीप गायकवाड आणि विवेक कदम अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरोधात कलम ४२०, ४०६ आणि ३४ या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिसांनी नमूद केले.
कॅब ड्रायव्हरला मारहाण करून लुटणाऱ्यांचा शोध सुरूच
दरम्यान, कॅब बूक केल्यानंतर निर्जन स्थळी कॅब ड्रायव्हरला मारहाण करून त्याची टॅक्सी आणि कागदपत्रांसह रोख रक्कम पळवणाऱ्या आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून शोधमोहिम तीव्र केली आहे. बुधवारी ही घटना घडली. अब्दुल सय्यद रेन (वय 38) या पीडित चालकाने बुधवारी रात्री बदलापूर ते ठाणे जाण्यासाठी टॅक्सीचे भाडे स्वीकारले होते.
मात्र प्रवास सुरू झाल्यानंतर उल्हास नदीजवळ एका निर्जन स्थळी आरोपींनी टॅक्सी थांबवून ड्रायव्हरला खाली उतरवले. सहा आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली आणि त्याचा मोबाईल, त्याची कार, त्यामधील कागदपत्रे आणि रोख रक्कम मिळून लाखोंचा माल घेऊन ते फरार झाले. लुटलेल्या सर्व वस्तूंची एकूण किंमत 8.11 लाख रुपये इतकी होती. याप्रकरणी बदलापूर गुन्हा नोंदवून वेगाने कारवाई केली आहे. मात्र, या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे, असे पोलिसांनी सांगितले.
