जुगार खेळण्यासाठी चोरी करायचा, सिद्धेश्वर एक्सप्रेसमधून प्रवाशाचे ११ तोळे सोने चोरणाऱ्यास अटक
आरोपीने मेल-एक्सप्रेसमध्ये झोपलेल्या प्रवाशांचा मौल्यवान ऐवजी चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने बेड्या घालण्यात यश मिळविले आहे.

लांबपल्ल्याच्या गाड्यांमध्ये झोपलेल्या प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरून आपला जुगाराचा छंद पुर्ण करणाऱ्या एका चोरट्याला सीसीटीव्हीच्या मदतीने रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. या सिद्धेश्वर एक्स्प्रेसने सोलापूर ते कल्याण असा प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाचे ११ तोळे सोने चोरीला गेले होते. ६ डिसेंबर २०२४ मध्ये ही घटना घडली होती. या प्रकरणात कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. कल्याण रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पुण्यातून एका आरोपीला अखेर अटक केली आहे. या आरोपीने आपला जंगली रमी हा ऑनलाईन जुगार खेळण्याचे व्यसन पुरे करण्यासाठी चोरी करण्याचा मार्ग पत्करला होता असे उघडकीस आले आहे.
गेल्यावर्षी ६ डिसेंबर रोजी तक्रारदार सोलापूर ते कल्याण असा सिद्धेश्वर एक्सप्रेसने प्रवास करीत होते. त्यावेळी त्यांनी स्लीपर सिटच्या बाजूच्या ट्रेवर आपली पर्स ठेवली होती. या पर्समध्ये असलेले ११ तोळे सोने चोरट्याने लांबवले. या प्रकरणात कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर पोलिसांनी रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्ही तपासले आणि गुप्त माहीतीच्या आधारे पुण्यातून योगेश चव्हाण याला अटक केली आहे. योगेश चव्हाण हा मूळचा पुणे येथील चाकण येथे राहणारा आहे. त्याच्याकडील माहीतीवरुन पोलिसांना पुण्यातील दोन सोनाराकडून १११.४३० ग्रॅम सोन्याची लगड जप्त केली असल्याचे कल्याण रेल्वे क्राइम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर यांनी सांगितले आहे.
जंगली रमी खेळण्यासाठी चोऱ्या
पोलिसांनी पुणे स्थानकातील सीसीटीव्ही तापसले असता एक तरुण स्टेशनवर संशयास्पदरित्या फिरताना पोलिसांना दिसून आला. सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. अखेर सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या तरुणाची ओळख पटली. योगेश चव्हाण असे या तरुणांचे नावे आहे. कल्याण रेल्वे क्राईम ब्रँच पोलिसांनी योगेश चव्हाणला पुण्यातून अटक केली आहे. आरोपी योगेश चव्हाण याला ऑनलाईन जुगार जंगली रमी खेळण्याचा नाद लागला होता.त्यामुळे त्याने रेल्वेत झोपलेल्या प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरी करण्याचा सपाटा लावला होता. त्याने यापूर्वी अनेक चोऱ्या केलेल्या असल्याचे उघड झाले आहे .त्याने केलेल्या अन्य गुन्ह्यांचा छडा लावण्याचे काम पोलिस करीत आहेत. या प्रकरणात पुणे येथील चोरीचे दागिने विकत घेणाऱ्या ज्वेलर्सची देखील चौकशी केली जाणार आहे.
