मी महिन्यातून दोन वेळा घरी यायचो, माझी बायको मुलीच्या सासऱ्याबरोबर बोलायची… पुढे काय घडलं? त्या घटनेची का होतेय चर्चा?
चंबित करणारी आणखी एक प्रेमकहाणी चर्चेत आली आहे. या प्रेमकहाणीत महिला थेट आपल्या मुलीच्या सासऱ्यासोबतच पळून गेली आहे.

अलीगडमधील एक अनोखे प्रेमप्रकरण सध्या देशभरात चर्चेत आहे. एका महिलेचा जीव तिच्या मुलीच्या होणाऱ्या जावयावर जडल्याने ती त्याच्यासोबत पळून गेल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात पोलिसांत तक्रार करण्यात आलीय. एकीकडे हे प्रकरण चर्चेत असतानाच आता दुसरीकडे अचंबित करणारी आणखी एक प्रेमकहाणी चर्चेत आली आहे. या प्रेमकहाणीत महिला थेट आपल्या मुलीच्या सासऱ्यासोबतच पळून गेली आहे.
ममता आणि शैलेंद्र गेले पळून
या प्रेमकहाणीतील महिलेचे नाव ममता असून तिच्या प्रियकराचे म्हणजेच तिच्या मुलीच्या सासऱ्याचे नाव शैलेंद्र असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही महिला तिच्या मुलीच्या सासऱ्यासोबत घरातील पैसे आणि दागिने घेऊन पळून गेली आहे. हे प्रकरण उत्तर प्रदेशमधील बदौन येथील आहे.
ममताचा नवरा ट्रक ड्रायव्हर
ममता शैलेंद्रसोबत पळून गेल्यानंतर या महिलेच्या पतीने नेमकं काय घडलं याबाबत माहिती दिली आहे. ममताच्या पतीचे नाव सुनिल कुमार आहे. ते एक ट्रक ड्रायव्हर आहेत. महिन्यातून एक किंवा दोन वेळा ते घरी यायचे. दरम्यानच्या काळात घरखर्च चालावा म्हणून ते घरी नियमितपणे पैसे पाठवायचे. मात्र माझ्या गैरहजेरीत माझ्या मुलीचा सासरा माझ्या घरी यायचा, असा आरोप सुनिल कुमार यांनी केला आहे. विशेष म्हणजे खुद्द ममताच शैलेंद्र याला घरी बोलवायची असा आरोप सुनिल कुमार यांनी केलाय. ममता आणि सुनिल कुमार यांच्या मुलानेदेखील या आरोपांना दुजोरा दिला आहे.
ममताला चार मुलं, पण..
आमच्या प्रेमाला घरातील लोकांचा विरोध होऊ नये, म्हणून ममता आणि शैलेंद्र यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतल्याचा दावा केला जात आहे. ममता ही 43 वर्षांची आहे तर शैलेंद्र हा 46 वर्षांचा आहे. ममता आणि सुनिल कुमार यांना एकूण चार मुलं आहेत. त्यातील एका मुलीचे 2022 साली लग्न झाले होते. याच मुलीच्या सासऱ्यासोबत नंतर ममताचे प्रेमसंबंध जुळले, असा आरोप केला जातोय.
फोनवर बोलायची घरी बोलवायची
“मी एक ट्रक ड्रायव्हर आहे. मी महिन्यातून एक ते दोन वेळा घरी यायचो. मी घरी पैसे पाठवायचो. मात्र माझी बायको माझ्या मुलीच्या सासऱ्याला फोनवर बोलायची. त्याला घरी बोलवायची. नंतर त्यांचे प्रेमसंबंध जुळले. आता ती घरातील दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळून गेली आहे,” अशी माहिती सुनिल कुमार यांनी दिली.
रात्री घरी यायचा, पहाटे निघून जायचा
शेजाऱ्यांनीही या आरोपांना दुजोरा दिला आहे. रात्रीच्या अंधारात शैलेंद्र ममताच्या घरी यायचा आणि पहाटे निघून जायचा, असे शेजाऱ्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, याबाबत दातागंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत आम्ही तपास करत आहोत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
