बंदुकीसोबत 'Tik-Tok' व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न, गोळी सुटल्याने मृत्यू

बंदुकीसोबत 'Tik-Tok' व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न, गोळी सुटल्याने मृत्यू

नवी दिल्ली : मोबाईल अॅप्लिकेशन ‘टिक-टॉक’ने तरुणांना अक्षरश: वेड लावलं आहे. प्रत्येकजण मिळेल तिथे या ‘टिक-टॉक’वर व्हिडीओ बनवत असतो. या वेडामुळे अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. राजधानी दिल्लीतही ‘टिक-टॉक’मुळे एका 19 वर्षाच्या मुलाचा बंदुकीच्या गोळीने मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. बंदुकीसोबत ‘टिक-टॉक’वर व्हिडीओ बनवत असताना सलमान नावाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. सलमान त्याच्या दोन मित्रांसोबत ‘टिक-टॉक’ या अॅप्लिकेशनवर बंदुकीसोबत व्हिडीओ बनवत होता. त्यावेळी मित्राकडून चुकीने बंदुकीचं ट्रिगर ओढलं गेल्याने सलमानला जीव गमवावा लागला. दिल्लीमध्ये बाराखंभा परिसरात शनिवारी रात्री ही घटना घडली.

सोहेल आणि आमीर या मित्रांसोबत सलमान शनिवारी रात्री दिल्लीच्या इंडिया गेट परिसरात गेला होता. तिथून परत येत असताना हे मित्र ‘टिक-टॉक’वर व्हिडीओ बनवत होते. सलमान गाडी चालवत होता, सोहेल त्याच्या बाजूच्या सीटवर आणि आमीर मागच्या सीटवर बसला होता. तेव्हा सोहेलने एक देशी कट्टा काढला आणि तो सलमानच्या गालावर ठेवला. त्यावेळी ते बंदुकीसोबत व्हिडीओ बनवण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, अचानक त्या बंदुकीतून गोळी सुटली आणि सलमान जखमी झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

या घटनेनंतर सोहेल आणि आमीर घाबरले. ते थेट दरियागंज येथील सोहेलच्या नातेवाईकांच्या घरी गेले. तिथे त्यांनी रक्ताने माखलेले कपडे बदलले आणि सलमानला एलएनजेपी रुग्णालयात नेलं. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

याप्रकरणी बाराखंभा पोलिसांनी सलमानच्या मित्रांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच, आरोपींवर शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गतही कारवाई केली जाणार आहे. सलमानचे मित्र सोहेल आणि आमीरसह एकाला पोलिसांनी अटक केली आहे.

‘टिक टॉक’वर बंदी घालण्याची मागणी

‘टिक-टॉक’मुळे कुणाचा जीव गेल्याची ही काही पहिली घटना नाही. यापूर्वी अनेक तरुणांनी या अॅप्लिकेशनमुळे आपला जीव गमावला आहे. तसेच यावर अश्लील व्हिडीओ शेअर होत असतात. त्यामुळे देशातील काही राज्यांमध्ये या अॅप्लिकेशनवर बंदी घालण्यात यावी अशी मागणीही होत आहे. मद्रास उच्च न्यायालयाने ‘टिक-टॉक’वर बंदी घालण्याचे आदेश दिले होते. मात्र, या निर्णयाविरोधात काही युजर्सने सर्वोच्च न्यायलयात धाव घेतली. सध्या या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. 

‘टिक टॉक’ अॅप्लिकेशन 

‘टिक टॉक’ हे चीनमध्ये तयार करण्यात आलेले अॅप आहे. चीनमध्ये हे अॅप ‘डॉयइन’ नावाने प्रसिद्ध आहे. सप्टेंबर 2016 साली चीनने ‘डॉयइन’ या अॅपला चीनच्या ऑनलाईन मार्केटमध्ये लाँच केलं होत. त्यानंतर वर्षभरात ‘टिक टॉक’ या नावाने हे अॅप जगभरात लाँच झालं. 73 एमबीचे हे अॅप असून याचे 500 मिलियनपेक्षा जास्त युजर्स आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *