महायुतीत मोठा ट्विस्ट, शिंदे गटाचा नेता कमळावर लढण्यास तयार; कुणाचा पत्ता कट होणार?

| Updated on: Mar 20, 2024 | 7:57 PM

अमरावतीची जागा भाजपच लढणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे अमरावतीच्या जागेचा तिढा सुटला आहे. मात्र, अमरावतीतून कोण लढणार? याचा सस्पेन्स अद्यापही बाकी आहे. अमरावतीचा उमेदवार कमळावर लढणार असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र, नवनीत राणा यांनी भाजपमध्ये अद्यापही प्रवेश केलेला नाही. त्यातच शिंदे गटाच्या नेत्याने कमळावर लढण्याची उत्सुकता दाखवली आहे. त्यामुळे या जागेवर कोण उभं राहणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महायुतीत मोठा ट्विस्ट, शिंदे गटाचा नेता कमळावर लढण्यास तयार; कुणाचा पत्ता कट होणार?
cm eknath shinde
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

अमरावती | 20 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून पहिल्या टप्प्यातील अर्ज भरण्यासही सुरुवात झाली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून जुळवाजुळव सुरू झाली आहे. उमेदवारांची यादी फायनल करण्यापासून ते इच्छुकांची नाराजी दूर करण्यापर्यंतच्या जोरबैठकांना उधाण आलं आहे. महायुतीत अमरावतीच्या जागेवरून पेच निर्माण झाला होता. मात्र, ही जागा भाजपच लढवणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे सांगून टाकलं. फडणवीस यांनी ही घोषणा केलेली असतानाच शिंदे गटाच्या इच्छुक उमेदवाराने थेट कमळावरच लढण्याची इच्छा व्यक्त केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. त्यामुळे अपक्ष खासदार नवनीत राणा यांचं काय होणार? असा सवाल केला जात आहे.

शिंदे गटाचे नेते अभिजीत अडसूळ यांनी अमरावतीच्या जागेवरून मोठं विधान केलं आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. ते एनडीएचे वरिष्ठ नेते आहेत. अमरावतीची जागा भाजपची आहे, भाजपच लढणार आहे, असं त्यांनी सांगितलं. पण आमचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघे मिळून या जागेचा निर्णय घेतील. ही जागा शिवसेनने लढायची की भाजपने याचा निर्णय हे दोन्ही नेते घेतील, असं अभिजीत अडसूळ म्हणाले.

तर कमळावर लढू

आम्ही उमेदवारीचा दावा सोडलेला नाही. आम्ही त्या ठिकाणी उमेदवार म्हणून आहोत. त्यामुळे मला भाजपमधून लढायचं की शिवसेनेतून लढायचं हे मुख्यमंत्री ठरवतील. मुख्यमंत्री जो आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही लढू, असं अभिजीत अडसूळ यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी जर शिवसेनेच्या तिकीटावर लढायला सांगितलं तर आम्ही शिवसेनेच्या तिकीटावर लढू. त्यांनी जर कमळावर लढायचे तर आम्ही कमळाच्या चिन्हावर लढू. कारण अमरावतीची जागा शिवसेनेचीच आहे, असा दावाही त्यांनी केला.

धर्मांतर करावे लागेल

यावेळी त्यांनी रवी राणा यांच्यावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. रवी राणा जर मुख्यमंत्र्यांना भेटतील असतील तर त्यामध्ये काही आक्षेप नाही. पण राणा यांना भाजपमधूनच विरोध आहे. भाजपच्या 5-6 कार्यकर्त्यांनी मिटिंग घेऊन नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला. पक्षातील नेते, पदाधिकारी राणा यांच्या विरोधात आहेत, हे भाजपलाही माहीत आहे, असं सांगतानाच मागासवर्गीय समाजावर अन्याय होत आहे. अशा लोकांना जर पुन्हा तिकीट मिळणार असेल तर आम्हाला धर्म परिवर्तन करावं लागेल, असा इशाराच त्यांनी दिला.

फडणवीस काय म्हणाले?

दरम्यान, देवेंद्र फडणवीस हे अकोला येथे आले होते. यावेळी त्यांनी अमरावतीची जागा भाजपची असून भाजपच ही जागा लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं. तसेच नवनीत राणा गेली पाच वर्ष भाजपसोबत होत्या. त्यांनी संसदेत भाजप आणि मोदींची बाजून जोरदारपणे मांडली होती, असं सांगत नवनीत राणा यांना उमेदवारी देण्याचे संकेतही फडणवीस यांनी दिले होते. त्यामुळे अमरावतीत काय होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.