
Congress Poor Performance Bihar Election Result 2025: बिहार विधानसभा निवडणुकीत सर्वात खराब प्रदर्शन काँग्रेसचे आहे. काँग्रेसने 61 जागांवर निवडणूक लढवली. त्यातील 4 जागांवरच पक्षाला आघाडी घेता आली आहे. तर गेल्यावर्षी बिहारमध्ये काँग्रेसचे 19 आमदार होते. काँग्रेस बिहारमध्ये सुद्धा रसातळाला गेल्याचे समोर येत आहे. बडे बेआबरू होकर तेरे कूचे से हम निकले अशी म्हणण्याची वेळ काँग्रेसवर आली आहे. कारण ऑल इंडिया इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) या पक्षाने काँग्रेसला मागे टाकल्याचे समोर येत आहे.
काँग्रेसने महाआघाडीलाही बुडवले?
सध्या कल ज्याप्रमाणे समोर येत आहे. त्यावरून काँग्रेसचा सुपडा साफ झाल्याचे समोर येत आहे. या निवडणुकीत काँग्रेसने आरजेडीसह महाआघाडी केली होती. आरजेडीला 150 जागा देण्यात आल्या होत्या. तर काँग्रेस 61 जागांवर लढत होती. यावेळी राहुल गांधी यांनी बिहारच्या निवडणुकीत वोटचोरी आणि इतर मुद्यांवर जोरदार प्रचार केला. तेजस्वी यादव यांच्या सभांना पण मोठी गर्दी उसळली. पण त्याचे मतात परिवर्तन होऊ शकले नाही. बिहारमध्ये काँग्रेसचा जनाधारच हरवल्याचे दिसून आले. सुरुवातीला राहुल गांधी यांनी प्रचारात जान फुंकली. पण नंतर ते जसे बाजूला हटले. तसा फटका बसल्याचा दावा करण्यात येत आहे. पण इतकी सुमार कामगिरी एखादा राष्ट्रीय पक्ष करत असेल तर या पक्षाला मोठ्या बदलाची गरज असल्याचा चिमटा आता सत्ताधारी काढत आहेत.
AIMIM काँग्रेसवर भारी
बिहारमध्ये मुस्लीम लोकसंख्या जवळपास 17.7 टक्के इतकी आहे. अनेक जागांवर मुस्लीम मतदारांचा प्रभाव दिसून आला. एनडीएने यंदा चार मुस्लीम उमेदवारांना तिकीट दिले होते. ते सुद्धा आघाडीवर दिसत आहेत. तर किशनगंजपासून ते दरभंगापर्यंत अनेक मतदारसंघात मुस्लीम मतदार निर्णायक भूमिका बजावतात. यामध्ये नरकटियागंज,बेतिया, सिकटा, सुगौली, नरकटिया, ढाका, परिहार, बाजपट्टी, बिस्फी, मधुबनी, रानीगंज, फोर्बेसंगज, अररिया, जोकीहाट, सिकटी, ठाकूरगंज, किशनगंज, कोचाधामन, बैसी, कस्बा, पूर्णिया, कटिहार, कदवा, बलरामपूर, प्राणपूर, मनिहारी, बरारी, कोरहा, गौरा बौराम, दरभंगा ग्रामीण, दरभंगा, केवटी, जाले, सिवान, रघुनाथपूर, बडहरिया आणि भागलपूर या सारख्या मतदार संघाचा समावेश आहे.
सध्याच्या आकडेवारीनुसार, AIMIM बहादुरगंज, कोचाधामन, अमौर, बैसी आणि बलरामपूर या पाच जागांवर आघाडीवर आहे. या सर्व जागा किशनगंज, अररिया आणि जवळपासच्या जिल्ह्यांतील आहेत. येथे ओवेसी यांच्या पक्षाला गेल्या काही वर्षांत चांगले यश मिळताना दिसत आहे. धार्मिक ध्रुवीकरण करण्यात येते एमआयएमला यश आल्याचा आरोप होत आहे. तर काँग्रेसपेक्षा बिहारमध्ये एमआयएम वरचढ दिसत आहे.