भाजपची 8 टक्के मते चोरली, टास्क फोर्स घेणार गावोगावी जाऊन शोध
उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राच्या निकालामुळे भाजप नाराज आहे. या पराभवाची दहशत लखनौपासून दिल्लीपर्यंत पसरली आहे. पक्षाची सुमारे आठ टक्के मते चोरीला गेली आहेत. यावर पक्षाने विचारमंथन सुरू केले आहे.
केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार स्थापन झाले. तरीही पक्ष नेतृत्वाच्या मनात मात्र प्रचंड वेदना आहेत. 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाला एकहाती जवळपास 50 टक्के मते मिळाली होती. परंतु, 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप यावेळी 41 टक्क्यांचा आकडा पार करू शकला नाही. हे या वेदनांचे मूळ कारण आहे. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन प्रमुख राज्यांमध्ये भाजपचा झालेला पराभव यामुळे मतांची टक्केवारी कमी झाली आहे. युपी आणि महाराष्ट्रात भाजपचा पराभव झाला असला तरी या पराभवामुळे दिल्ली मात्र चिंतेत सापडली आहे.
उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राच्या निकालामुळे भाजप नाराज आहे. या पराभवाची दहशत लखनौपासून दिल्लीपर्यंत पसरली आहे. उत्तर प्रदेशच्या पराभवाबाबत दिल्ली आणि यूपीचे पदाधिकारी यांचे निरनिराळे तर्क आहेत. पक्षाची सुमारे आठ टक्के मते चोरीला गेली आहेत. यावर पक्षाने विचारमंथन सुरू केले आहे. या चोरीचा शोध घेण्यासाठी पक्ष विशेष टास्क फोर्स तयार करणार आहे. विशेषतः उत्तर प्रदेशमध्ये हा विशेष टास्क फोर्स भाजपची 8 टक्के चोरीला गेलेली मते शोधण्याचे काम करणार आहे.
भाजप पक्षाचे सर्व प्रदेशाध्यक्ष आणि सरचिटणीस यांची दिल्लीत महत्वाची बैठक झाली. यात प्रामुख्याने उत्तर प्रदेश राज्यातील सर्व जागांवर पराभवाची कारणे शोधण्यासाठी विशेष टास्क फोर्स तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक जिल्ह्यातील लोकसभा आणि विधानसभा स्तरावर हा टास्क फोर्स पाठविण्यात येणार आहे. या टास्क फोर्समध्ये 50 ते 60 जणांचा समावेश आहे. पक्षाच्या पराभवाची सर्व कारणे टास्क फोर्सला शोधावी लागणार आहेत.
2019 च्या निवडणुकीत ज्या जागा भाजपने जिंकल्या होत्या त्या जागा हातून गेल्याच. याशिवाय ज्या गमावल्या होत्या त्यावरही भाजपचे उमेदवार विजयी होऊ शकले नाही. राज्यात पक्षाची एवढी मोठी व्होटबँक असूनही त्याचा भंग कसा झाला? पक्षाकडे एवढी मोठी यंत्रणा असूनही कुठे आणि कोणत्या स्तरावर चूक झाली? याचा शोध हा टास्क फोर्स घेणार आहे.
भाजपच्या या टास्क फोर्समध्ये पक्षाचे पदाधिकरी, लोकप्रतिनिधी अशा सर्वांनाच स्थान देण्यात येणार आहे. हे सर्व जण प्रत्येक गावात, रस्त्यावर, वस्तीत जाऊन मतांची चोरी कशी झाली याची माहिती घेणार आहेत. राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात याच आठवड्यात टास्क फोर्सची पथके पाठवली जाणार आहेत. देशातील सर्वात मोठ्या राज्यात पक्षाची झालेली वाताहत आणि त्यापाठोपाठ महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये हा टास्क फोर्स महत्वाची भूमिका बजावणार आहे.