ती गोष्ट खटकली, सुषमा अंधारे यांच्या अडचणीत वाढ; निवडणूक आयोगाकडे कुणाची तक्रार?

| Updated on: Apr 13, 2024 | 6:18 PM

वर्ध्याचे खासदार आणि महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या सूनेला घेऊन पत्रकार परिषद घेतल्यानंतर सुषमा अंधारे या अडचणीत सापडल्या आहेत. या पत्रकार परिषदेतील एका गोष्टीवर थेट राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने आक्षेप घेतला आहे. आयोगाच्या अध्यक्षांनी केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहून सुषमा अंधारे यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

ती गोष्ट खटकली, सुषमा अंधारे यांच्या अडचणीत वाढ; निवडणूक आयोगाकडे कुणाची तक्रार?
Sushma Andhare
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सुषमा अंधारे यांनी दोन दिवसांपूर्वी पूजा तडस यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी पूजा तडस यांच्या 17 महिन्यांच्या मुलालाही पत्रकार परिषदेत आणण्यात आलं होतं. राज्य बालहक्क संरक्षण आयोगाला नेमकी हीच गोष्ट खटकली आहे. आयोगाच्या आयुक्तांनी अंधारे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. तसेच लहान मुलाला अशा पद्धतीने पत्रकार परिषदेत आणून लहान मुलाचा वापर प्रचारात केल्याबद्दल सुषमा अंधारे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या आयुक्तांनी केली आहे. त्यामुळे अंधारे यांचं टेन्शन वाढलं आहे.

राजकीय फायद्यासाठी किंवा निवडणूक प्रचारात लहान मुलांचा वापर कोणत्याही परिस्थितीत निषेधार्थ आहे. मात्र, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी निवडणूक आयोगाचे नियम हे धाब्यावर बसवले आहेत. नागपूर येथे वर्ध्याचे खासदार आणि महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेताना सुषमा अंधारे यांनी तडस यांचा 17 महिन्यांच्या नातवाला देखील मंचावर उपस्थित केलं होतं. राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा ॲड. सुशीबेन शहा यांनी या प्रकरणाची दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांना पत्र लिहिलं आहे, याबाबत कठोर कारवाईची मागणी केली.

आयोगाचे नियम काय?

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निर्देशानुसार, प्रचारसभा, मोर्चा, घोषणाबाजी, पोस्टर चिकटवणे अशा निवडणुकीसंदर्भात कोणत्याही कामासाठी लहान मुलांचा वापर केला जाऊ शकत नाही. राजकीय नेत्यांनी आणि उमेदवारांनी लहान मुलांना हातात धरुन, वाहनात किंवा रॅलीमध्ये घेऊन जाणे. तसेच कोणत्याही प्रकारे प्रचाराच्या कामांसाठी मुलांचा वापर करू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

शहा काय म्हणाले?

कविता, गाणी, उच्चारलेले शब्द, राजकीय पक्ष/उमेदवार यांच्या चिन्हाचे प्रदर्शन, राजकीय पक्षाच्या विचारसरणीचे प्रदर्शन, एखाद्या पक्षाच्या यशाचा प्रचार यासह कोणत्याही प्रकारे राजकीय मोहिमेचे स्वरुप निर्माण करण्यासाठी मुलांचा वापर करण्यापर्यंत विस्तारित आहे. यात विरोधी राजकीय पक्ष किंवा उमेदवार यांच्यावर टीका करण्यासाठीही मुलांचा वापर होऊ शकत नाही; असे निर्देश निवडणूक आयोगाने स्पष्ट शब्दांत दिले आहेत, अशी माहिती ही ॲड. शहा यांनी दिली.

कारवाई करा

सुषमा अंधारे यांनी राजकीय स्वार्थासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांची पायमल्ली केल्याचं स्पष्ट होत आहे. महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली असून आयोग स्तरावर याची चौकशी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून या प्रकरणी लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी सुशीबेन शहा यांनी पत्राद्वारे केली आहे.