
शिर्डी लोकसभा मतदारसंघात मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. गेल्या 10 वर्षांपासून खासदार असलेले शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे यांना ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांना जोराचा धक्का दिला आहे. मतमोजणीच्या सुरुवातीपासून ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे हे आघाडीवर आहेत. भाऊसाहेब वाकचौरे मतमोजणीच्या तिसऱ्या फेरीनंतर 5500 मतांनी आघाडीवर होते. त्यांना संगमनेर, अकोले आणि कोपरगावमध्ये जास्त मतं मिळाली. यानंतर मतमोजणीच्या पाचव्या फेरीत भाऊसाहेब वाकचौरे हे 10785 मतांनी आघाडीवर होते. पाचव्या फेरीत भाऊसाहेब वाकचौरेंना 1 लाख 12 हजार 653 मते तर सदाशिव लोखंडे यांना 1 लाख 1 हजार 868 मते मिळाल्याची नोंद झाली. यानंतर सहाव्या फेरीतही वाकचौरे यांना 14879 मतांची लीड मिळाली. यानंतर सातव्या आणि आठव्या फेरीतही भाऊसाहेब वाकचौरे यांना जबरदस्त लीड मिळाताना दिसलं. भाऊसाहेब वाकचौरे 16 व्या फेरीत 36 हजार मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे भाऊसाहेब वाकचौरे यांची वाटचाल विजयाकडे असल्याचे संकेत मिळत आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघात इतर मतदारसंघाच्या तुलनेने बऱ्यापैकी मतदान झालं. शिर्डी लोकसभेत 63.03 टक्के मतदान पार पडलं. या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत बघायला मिळाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून सदाशिव लोखंडे हे निवडणुकीच्या रणांगणात होते. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून भाऊसाहेब वाकचौरे निवडणुकीच्या मैदानात होते. शिर्डीत खरी लढत या दोन ताकदवार उमेदवारांमध्येच झाली. शिवसेना पक्षात पडलेल्या फुटीनंतर ही निवडणूक जास्त महत्त्वाची आहे. आजच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात त्याचे दुरगामी परिणाम पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाकरे गटासाठी आजचा निकाल म्हणजे सत्व परीक्षा आहे. शिर्डीचा निकालही आता समोर येत आहे.
शिर्डीत पहिली निवडणूक ही 2009 मध्ये पार पडली होती. या मतदारसंघात अकोले, संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर आणि नेवासा अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघात 2009 मध्ये पार पडलेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे भाऊसाहेब वाकचौरे यांचा विजय झाला होता. यानंतर 2014 ला शिवसेनेने सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी दिली. तर वाकचौरे यांनी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. पण या निवडणुकीत वाकचौरे यांचा 1,99,922 मतांनी पराभव झाला होता.
यानंतर 2019 च्या निवडणुकीत सदाशिव लोखंडे यांना पुन्हा शिवसेनेने उमेदवारी दिली. त्यांच्याविरोधात काँग्रेसकडून भाऊसाहेब कांबळे यांना संधी देण्यात आली. पण शिर्डीच्या नागरिकांनी पुन्हा सदाशिव लोखंडे यांच्यावर विश्वास ठेवला. यानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या आहेत. शिवसेनेत आणि राष्ट्रवादीत फूट पडली आहे. त्यामुळे यावेळी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनी कुणाला मतदान केलं, ते आज स्पष्ट होत आहे.
लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE मतमोजणी अपडेट्स