सोनम वांगचुक यांच्या आंदोलनानंतर ‘3 इडियट्स’ रि-रिलीज होणार? निर्मात्यांनी सांगूनच टाकलं
गेल्या काही दिवसांपासून सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाची देशभरात चर्चा सुरु आहे. अशातच आता या चर्चांदरम्यान आमिर खानचा '3 इडियट्स' हा चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जात आहे. काय आहे नेमकं सत्य? जाणून घ्या सविस्तर

गेल्या काही दिवसांपासून देशभरात सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाची जोरदार चर्चा सुरू आहे. दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनामुळेही हा विषय सातत्याने चर्चेत राहिला. या पार्श्वभूमीवर आमिर खानचा सुपरहिट चित्रपट ‘3 इडियट्स’ पुन्हा चर्चेत आला आहे. चित्रपटातील ‘फुन्सुख वांगडू’ हे पात्र सोनम वांगचुक यांच्यावर आधारित असल्याची चर्चा अनेक वर्षांपासून रंगत आली आहे. मात्र, नुकत्याच एका मुलाखतीत आमिर खानने या चर्चांना पूर्णविराम देत, ‘फुन्सुख वांगडू हे पात्र थेट सोनम वांगचुक यांच्यावर आधारित नाही’ असे स्पष्ट केले.
याचदरम्यान सोशल मीडियावर आणि काही माध्यमांमध्ये ‘3 इडियट्स’ हा चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याच्या बातम्या वेगाने व्हायरल झाल्या. विशेष म्हणजे, 4 सप्टेंबर रोजी हा चित्रपट री-रिलीज होणार असल्याचा दावा अनेक ठिकाणी करण्यात आला होता. त्यामुळे चाहत्यांमध्येही मोठी उत्सुकता निर्माण झाली होती.
मात्र, या सर्व चर्चांवर आता चित्रपटाचे निर्माते विधू विनोद चोप्रा यांनी अधिकृत स्पष्टीकरण देत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, ‘3 इडियट्स’च्या पुनर्प्रदर्शनाचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी या अफवांचे खंडन केले.
‘3 इडियट्स’ रि-रिलीज होणार?
विधू विनोद चोप्रा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘काही माध्यमांमध्ये ‘3 इडियट्स’ हा चित्रपट 4 सप्टेंबर रोजी पुन्हा प्रदर्शित होणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. आम्ही स्पष्ट करू इच्छितो की, या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही. चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याबाबत कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही.’
यासोबतच त्यांनी चाहत्यांना आणि माध्यमांना आवाहन केले की, चित्रपटासंदर्भातील कोणतीही माहिती किंवा घोषणा केवळ ‘विधू विनोद चोप्रा फिल्म्स’च्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्स आणि अधिकृत माध्यमांवरूनच विश्वास ठेवावा. अफवांवर विश्वास ठेवू नये असेही त्यांनी नमूद केले.
2009 मध्ये प्रदर्शित झालेला ‘3 इडियट्स’ हा चित्रपट भारतीय सिनेसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांपैकी एक मानला जातो. शिक्षणव्यवस्थेवरील भाष्य, मैत्री, करिअर आणि जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन यामुळे हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो. त्यामुळे चित्रपटाच्या पुनर्प्रदर्शनाच्या बातम्यांमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, निर्मात्यांच्या अधिकृत स्पष्टीकरणानंतर या चर्चांना सध्या तरी पूर्णविराम मिळाला आहे.
