आमिरच्या मुलीने दिली मेंटल हेल्थबाबत मोठी अपडेट; तब्बल 8 वर्षांच्या उपचारांनंतर..
आमिर खानची मुलगी आयरा खानने तिच्या मानसिक आरोग्याविषयी मोठी अपडेट दिली आहे. आईवडिलांच्या घटस्फोटानंतर आयरा नैराश्यात गेली होती आणि तेव्हापासून ती त्यावर उपचार घेत होती. जवळपास आठ वर्षांपासून ती थेरपी सेशन्सला जायची.

अभिनेता आमिर खान आणि त्याची पहिली पत्नी रिना दत्ता यांची मुलगी आयरा खान तिच्या नैराश्याबद्दल अनेकदा मोकळेपणे व्यक्त झाली. यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून ती उपचारसुद्धा घेत आहे. जवळपास आठ वर्षांच्या उपचारानंतर अखेर तिचं थेरपी सेशन संपुष्टात आलं आहे. याबद्दलची माहिती खुद्द आयराने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित दिली. थेरपी संपली असली तरी आयरा पुढील काही काळ औषधांवर असेल.
आयरा खानची पोस्ट-
’13 ऑक्टोबर रोजी माझ्या थेरपीचा शेवटचा सेशन होता. 8 वर्षे आणि आठवड्यातून तीन वेळा मनोविश्लेषणानंतर आता मला थेरपीची गरज नाही. मग आता मी ठीक झाले का? मी अजूनही औषधांवर आहे आणि कदाचित आगामी काही काळासाठी औषधांवरच असेन. आता थेरपी संपल्याचा अर्थ असा होता की मला आणि माझ्या थेरपिस्टला खात्री वाटली की मी खूप काही शिकलेय. आता माझं आयुष्य मी अधिक चांगल्याप्रकारे जगू लागले आहे (माझ्यासाठी) आणि मी स्वत:चं मॅनेजमेंटही करू शकेन. जबाबदारीने स्वत:ची काळजी घेईन आणि आयुष्यात मजा करायला विसरणार नाही’, असं तिने म्हटलंय.
View this post on Instagram
या पोस्टमध्ये तिने पुढे लिहिलंय, ‘जोपर्यंत ठीक होण्याची गोष्ट आहे, मी नैराश्यातून मुक्त होतेय आणि माझ्या औषधांमुळे मी भविष्यात येणाऱ्या नैराश्याचं व्यवस्थित मॅनेजमेंट करू शकेन. जर मी ते करू शकले नाही, तर मी नक्कीच मदतीसाठी विचारेन. याला असं म्हणत नाहीत किंवा अशी कोणती गोष्ट अस्तित्वात नाही, पण तरीही मला ते म्हणायला आवडेल की.. मी थेरपीमध्ये ग्रॅज्युएशन केलं आणि मी पास झाले.’
एका मुलाखतीत आयराने तिच्या डिप्रेशनसाठी आईवडिलांच्या घटस्फोटाला जबाबदार ठरवलं होतं. आईवडिलांचा घटस्फोट हा परस्पर संमतीने जरी असला तरी त्याचा तिच्या मानसिक आरोग्यावर खोलवर परिणाम झाल्याचं ती म्हणाली होती. आयराने सांगितलं की तिच्या थेरपीस्टच्या मते, तिच्या पालकांचा घटस्फोट हा नैराश्याचा ट्रिगर पॉईंट होता. पण माझ्या मानसिक स्थितीसाठी मी आईवडिलांना दोष देत नाही, असंही तिने स्पष्ट केलं होतं.
