एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं काय आहे प्रकरण?
एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असून या पार्श्वभूमीवर त्यांनी नुकतीच राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी अभिजीत पानसेसुद्धा त्यांच्यासोबत होते. 'अब तक 112' असं या चित्रपटाचं नाव आहे.

एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवला जात आहे. अभिजीत पानसे हा चित्रपट करणार आहेत. या पार्श्वभूमीवर प्रदीप शर्मा आणि अभिजीत पानसे यांनी आज (शुक्रवार) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. ‘अब तक 112’ असं या चित्रपटाचं नाव आहे. “पानसेंनी याआधी माझ्यावर ‘रेगे’ हा चित्रपट केला होता. आताही ते दुसरा चित्रपट करतायत. जी अनटोल्ड स्टोरी आहे, जे लोकांना माहीत नाही, ती पुढे आणा, असं राज ठाकरेंनी सांगितलं”, अशी प्रतिक्रिया प्रदीप शर्मांनी भेटीनंतर दिली. या चित्रपटात आणखी काय वेगळं पहायला मिळणार, याविषयीची माहिती पानसेंनी दिली.
काय म्हणाले अभिजीत पानसे?
“नुकतंच आम्ही ‘अब तक 112’ या चित्रपटाची घोषणा केली होती. प्रदीप शर्मा हे नाव गेल्या 35 ते 40 वर्षांपासून मुंबई, महाराष्ट्र आणि अख्ख्या जगाला माहीत आहे. ज्यांचा ‘टाईम मॅगझिन’च्या फ्रंट पेजवर फोटो आला, मुंबई स्वच्छ करण्यात ज्या एन्काऊंटर स्पेशलिस्टचा हात आहे, त्यापैकी महत्त्वाचं नाव म्हणजे प्रदीप शर्मा. या विषयावर अनेक चित्रपट येऊन गेले. पण पोलीस अधिकाऱ्याचं किंवा एन्काऊंटर स्पेशलिस्टचं आयुष्य कसं असतं, त्यांना काय करावं लागतं, काय भोगावं लागतं, हे यातून प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. त्यांची एक ह्युमन बाजू समोर आली नाही, आतापर्यंत ग्लॅमरस बाजू समोर आली नाही. ते काही त्यांचे बायोपिक नाहीत,” असं ते म्हणाले.
View this post on Instagram
“या विषयावर जेव्हा चित्रपट करायचं ठरलं, तेव्हापासून म्हणजेच गेल्या सव्वा वर्षापासून आम्ही त्यांच्या भेटीगाठी घेतोय. राज ठाकरे हे मनसे अध्यक्ष असले तरी अत्यंत कलाप्रेमी आणि कलासक्त आहेत. त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही त्यांची भेट घेतली,” असं पानसेंनी सांगितलं.
प्रदीप शर्मा यांचं कुटुंब मूळचं उत्तर प्रदेशातील आग्रा इथलं आहे. त्यांचे वडील महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात स्थायिक झाले. ते शिक्षक होते. प्रदीप शर्मा यांचं प्राथमिक शिक्षण आणि पदव्युत्तर पदवीचं शिक्षण धुळ्यातच पूर्ण झालं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांची एमपीएससीने निवड झाली आणि ते पोलीस सेवेत रुजू झाले.
