Abhishek Bachchan : अभिषेक बच्चनला पुन्हा करायचंय ‘कजरा रे’! पण ऐश्वर्या-अमिताभ यांची परवानगी मिळणार का?
'बबली और बंटी' फिल्ममधील 'कजरा रे' या गाण्याचा आयकॉनिक गीतांमध्ये समावेश होतो. या गाण्याबद्दल आता अभिषेक बच्चनने महत्वाचं वक्तव्य केलं आहे.

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनच्या (Abhishek Bachchan) करिअरमधील अनेक गाजलेल्या गाण्यांपैकी ‘कजरा रे’ हे आजही प्रेक्षकांच्या विशेष पसंतीचं आहे. या गाण्यात अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि अमिताभ बच्चन हे तिघेही पहिल्यांदाच एकत्र दिसले होते. त्यामुळे या गाण्याची क्रेझ आजही कायम आहे. पार्टी असो किंवा एखादा सेलिब्रेशनचा क्षण, ‘कजरा रे’ वाजल्याशिवाय मजा काहीशी अधुरीच असते. ऐश्वर्या रायच्या जबरदस्त डान्स मूव्ह्ज, तिचे लटके-झटके अभिषेक बच्चनची एनर्जी आणि अमिताभ बच्चनचा खास अंदाज यामुळे हे गाणं प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर करून बसलं.
अनेक वर्षांनंतर आता अभिषेक बच्चनने या आयकॉनिक गाण्याच्या शूटिंगच्या आठवणींना उजाळा दिला आहे. विशेष म्हणजे, ‘कजरा रे’च्या शूटिंगचा अनुभव एखाद्या नेहमीच्या कोरिओग्राफ केलेल्या गाण्यापेक्षा वेगळाच होता, असं त्याने सांगितलं.
‘कजरा रे’च्या शूटिंगमध्ये काय झाली होती धमाल?
BBC Asian Network ला दिलेल्या मुलाखतीत अभिषेक बच्चनने ‘कजरा रे’च्या शूटिंगबद्दल अनेक मजेदार किस्से सांगितले. त्याच्या मते, त्याने आजवर केलेल्या गाण्यांच्या शूटिंगपैकी ‘कजरा रे’च्या शूटिंगमध्ये त्याने सर्वाधिक मजा केली.
अभिषेकच्या मते, गाण्याचं शूटिंग एखाद्या कोरिओग्राफ केलेल्या सीनसारखं नव्हतं, तर सेटवर जणू एक मोठी डान्स पार्टीच रंगली होती. संपूर्ण वातावरण अतिशय आनंदी आणि उत्साहपूर्ण होतं. विशेष म्हणजे, या शूटिंगदरम्यान अभिषेकचा वाढदिवसही आला होता. टीमने सेटवरच त्याचा वाढदिवस साजरा केला. त्यामुळे गाण्याच्या शूटिंगसोबतच सेलिब्रेशनचीही धमाल झाली.
दिग्दर्शक शाद अलींची हटके पद्धत
‘कजरा रे’च्या शूटिंगची आणखी एक खास गोष्ट म्हणजे दिग्दर्शक शाद अली यांनी गाणं शूट करण्यासाठी वेगळी पद्धत वापरली होती. अभिषेकने सांगितलं की, शाद अली यांनी जवळपास चार तास गाणं सतत वाजवलं आणि सेटवरील सर्व कलाकार आणि टीमला मनसोक्त डान्स करू दिला. या काळात प्रत्येकजण आपल्या पद्धतीने एन्जॉय करत होता. शाद अली यांनी या डान्स पार्टीदरम्यान कलाकारांचे नैसर्गिक डान्स मूव्ह्ज, एक्सप्रेशन्स आणि मजेशीर क्षण कॅमेऱ्यात कैद केले. यापैकी अनेक शॉट्स नंतर गाण्याच्या अंतिम व्हर्जनमध्ये वापरण्यात आले.
‘कजरा रे’ला मिळालं कल्ट स्टेटस
अभिषेक बच्चनने ‘कजरा रे’ला मिळालेल्या लोकप्रियतेबद्दलही भाष्य केलं. त्याच्या मते, या गाण्याने कालांतराने एक वेगळंच कल्ट स्टेटस मिळवलं आहे. आजही हे गाणं ऐकल्यावर त्याला त्या शूटिंगच्या आठवणी येतात. गाण्याच्या शूटिंगदरम्यान त्याने आणि संपूर्ण टीमने खूप एन्जॉय केलं होतं, असंही त्याने सांगितलं.
‘कजरा रे 2.0’मध्ये काम करणार का अभिषेक?
मुलाखतीदरम्यान अभिषेकला ‘कजरा रे 2.0’ बनवलं तर त्यात काम करायला आवडेल का, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अभिषेकने सकारात्मक प्रतिक्रिया दिली. त्याने मजेशीर अंदाजात सांगितलं की, तो नक्कीच अशा प्रोजेक्टसाठी तयार असेल. मात्र, त्यासाठी आधी ऐश्वर्या राय बच्चन आणि त्याचे वडील अमिताभ बच्चन यांना तयार करावं लागेल, असं त्याने मिश्कीलपणे म्हटलं. त्यामुळे सध्या ‘कजरा रे 2.0’बाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी अभिषेक बच्चनची ही प्रतिक्रिया चाहत्यांसाठी नक्कीच उत्सुकता वाढवणारी आहे.
