बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध होण्यासाठी ‘या’ अभिनेत्रीने बदललं नाव, पाकिस्तानी क्रिकेटरसोबत केलं लग्न
बॉलिवूडमधील या अभिनेत्रीने प्रसिद्ध होण्यासाठी चक्क स्वत:चे नाव बदलले. काही दिवसांमध्ये पाकिस्तानी क्रिकेटरसोबत केलं लग्न. तुम्ही ओळखलं का?

Bollywood Actress: बॉलिवूडच्या सुवर्णकाळात आपल्या कातिल नजरा, प्रभावी अभिनय आणि दमदार उपस्थितीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सदाबहार अभिनेत्री रीना रॉय आज 69 वा वाढदिवस साजरा करत आहेत. 70 आणि 80 च्या दशकात असा एक काळ होता, जेव्हा केवळ रीना रॉय यांचे नाव पोस्टरवर असणे म्हणजे चित्रपटाच्या यशाची हमी मानली जात होती.
रीना रॉय यांचा जीवनप्रवास अजिबात सोपा नव्हता. फार कमी लोकांना माहीत आहे की रीना रॉय यांचा जन्म एका मुस्लिम कुटुंबात झाला होता आणि त्यांचे मूळ नाव सायरा अली होते. त्यांचे वडील सादिक अली आणि आई शारदा रॉय यांच्यात घटस्फोट झाल्यानंतर रीना आणि त्यांच्या भावंडांची संपूर्ण जबाबदारी आईवर येऊन पडली.
पालक वेगळे झाल्यानंतर त्यांच्या आईने त्यांचे नाव बदलून रूपा रॉय ठेवले. मात्र, चित्रपटसृष्टीत प्रवेश करताना एका दिग्दर्शकाच्या सल्ल्याने त्यांनी आपले नाव रीना रॉय असे ठेवले आणि हेच नाव पुढे जाऊन त्यांची खरी ओळख बनले.
करिअरची सुरुवात आणि यशस्वी वाटचाल
रीना रॉय यांनी 1972 साली ‘जरूरत’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. जरी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला तरी त्यांच्या बोल्ड अभिनयाने आणि आत्मविश्वासाने अनेक दिग्दर्शकांचे लक्ष वेधून घेतले.
खऱ्या अर्थाने त्यांचे नशीब बदलले ते 1976 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कालीचरण’ या चित्रपटामुळे. या चित्रपटाने रीना रॉय यांना रातोरात स्टार बनवले. याच चित्रपटातून शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबतची त्यांची जोडी प्रचंड लोकप्रिय झाली. जी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
वैयक्तिक आयुष्य आणि चित्रपटसृष्टीपासून दूर जाण्याचा निर्णय
करिअर शिखरावर असतानाच 1983 साली रीना रॉय यांनी पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहसिन खान यांच्याशी विवाह करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. लग्नानंतर त्यांनी बॉलिवूडला अलविदा केला.
मात्र, ही वैवाहिक नाती फार काळ टिकली नाहीत. घटस्फोटानंतर त्या आपल्या मुलीसह भारतात परतल्या. 1993 मध्ये ‘आदमी खिलौना है’ या चित्रपटातून त्यांनी कमबॅक करण्याचा प्रयत्न केला पण तो फारसा यशस्वी ठरला नाही.
आज जरी रीना रॉय चित्रपटसृष्टीपासून दूर असल्या तरी त्यांच्या अभिनयाची जादू आजही कायम आहे. त्यांच्या चित्रपटांमधील भूमिका, संवाद आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वामुळे त्या आजही प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान राखून आहेत.
