ही सर्कस पाहणं हृदयद्रावक..; धर्मेंद्र यांच्या घराबाहेरील पापाराझींवर भडकला प्रसिद्ध दिग्दर्शक
धर्मेंद्र यांच्या प्रकृतीविषयी सातत्याने चिंता व्यक्त केली जात असताना पापाराझींकडून सतत देओल कुटुंबीयांच्या खासगीपणाचं उल्लंघन केलं जात आहे. त्यांच्या या वर्तनावर आता निर्माता-दिग्दर्शक करण जोहरनेही संताप व्यक्त केला आहे.

सनी देओलनंतर आता निर्माता-दिग्दर्शक करण जोहर आणि अभिनेत्री अमीषा पटेलने पापाराझींवर राग व्यक्त केला आहे. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती खालावल्यापासून सातत्याने देओल कुटुंबीयांकडून त्यांच्या खासगीपणाचा आदर करण्याचं आवाहन केलं जात आहे. असं असतानाही पापाराझींकडून सतत त्यांच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ केली जातेय. इतकंच नव्हे तर रुग्णालयातील धर्मेंद्र यांचा एक अत्यंत खासगी व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. यावर आधी सनी देओलने तीव्र संताप व्यक्त केला. त्यानंतर आता करण जोहर आणि अमीषा पटेल यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट लिहिली आहे.
करण जोहरची पोस्ट-
‘जेव्हा मूलभूत सौजन्य आणि संवेदनशीलता आपल्या हृदयातून आणि आपल्या कृतीतून निघून जाते, तेव्हा आपण माणूस म्हणून संपलोय असं समजा. कृपया देओल कुटुंबाला एकटं सोडा. ते आधीच भावनिकदृष्ट्या खूप संघर्ष करत आहेत. आपल्या चित्रपटसृष्टीत इतकं मोठं योगदान देणाऱ्या एका दिग्गजासाठी पापाराझी आणि मीडियाची ही सर्कस पाहणं हृदयद्रावक आहे. हे कव्हरेज नाही तर अवमान आहे’, अशा शब्दांत करणने फटकारलं आहे.

अभिनेत्री अमीषा पटेलनेही हीच भावना व्यक्त केली. ‘माझं ठाम मत आहे की मीडियाने यावेळी देओल कुटुंबाला एकटं सोडलं पाहिजे आणि त्यांच्या खासगीपणाचा आदर केला पाहिजे’, असं तिने हात जोडलेल्या इमोजीसह लिहिलं होतं.

सनी देओलने पापाराझींना फटकारलं
“तुमच्याही घरी आई-वडील आहेत, मुलंबाळं आहेत. मूर्खासारखे व्हिडीओ का पोस्ट करत आहात? तुम्हाला जराही लाज वाटत नाही का,” असा संतप्त सवाल सनी देओलने पापाराझींना केला होता. धर्मेंद्र यांच्या प्रकृतीविषयी देशभरातून चिंता व्यक्त केली जात आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असला तरी ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. अशातच आजारपणाने आणि वृद्धापकाळाने खंगलेल्या धर्मेंद्र यांचा रुग्णालयाील एक व्हिडीओ सोशल मीडियावर पापाराझींनी पोस्ट केला होता. याच व्हिडीओमुळे सनी देओलचा राग अनावर झाला.
गेले दोन दिवस ब्रीच कँडी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार घेतल्यानंतर बुधवारी सकाळी धर्मेंद्र यांना घरी पाठवण्यात आलं. त्यांच्यावर पुढील उपचार घरीच करण्यात येणार असल्याची माहिती देओल कुटुंबीयांनी दिली.
