Sai Ali Khan : चोरटा लोकलने मुंबईबाहेर पळाला ? 3 दिवसांनंतरही सैफच्या हल्लेखोराचा मागमूस लागेना
सैफ अली खान यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आरोपी अजूनही पकडण्यात आलेला नाही. पोलिसांना संशय आहे की तो लोकल किंवा एक्स्प्रेस गाडीने मुंबईबाहेर गेला आहे. आरोपीचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड सापडला नाही आणि त्याचे कुटुंबीय किंवा मित्रही ओळखता आले नाहीत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत आणि आरोपीने हल्ल्यानंतर आपले कपडे बदलल्याचे आढळून आले आहे. पोलिसांची अनेक पथके आरोपींचा शोध घेत आहेत.

अभिनेता सैफ अली खान याच्या घरात घुसून चोरीच्या प्रयत्नात असणाऱ्या आरोपीने त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. बुधवारी मध्यरात्री घडलेल्या या हल्ल्याला आता तीन दिवस उलटून गेले असून हल्लेखोर अद्यापही पोलिसांच्या ताब्यात सापडलेला नाही. आता याप्रकरणी एक नवी अपडेट समोर आली आहे. सैफवर हल्ला करणारा आरोपी हा लोकल किंवा एक्स्प्रेस गाडी पकडून मुंबईच्या बाहेर गेल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त होत आहे. पोलिसांची अनेक पथके लोकल आणि एक्स्प्रेस रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ला करणारा हा चोर हा सराईत असल्याचे दिसत नाही. आजपर्यंत पोलिसांना त्या चोराचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड सापडलेला नाही. तसेच त्याच्या कुटुंबीयांची किंवा मित्राचीही माहिती पोलिसांना मिळालेली नाही. या हल्ल्याला आता 48 तास उलटून गेल्यानंतरही पोलिसांना आरोपी अद्याप सापडला नाही. तांत्रिक नेटवर्ककडून कोणतीही मदत मिळालेली नाही त्यामुळे आता पोलीस हे एक्स्पर्टची मदत घेत आहेत.
पोलिस शोध घेत होते, आरोपी शर्ट बदलून फिरत होता
पोलीस तपास सुरू असतानाच आणखी एक माहिती समोर आली आहे, ती म्हणजे जेव्हा ज्या व्यक्तीनं सैफवर हल्ला केला, त्याने नंतर आपण पकडले जाऊ नये यासाठी आपले कपडे बदलले होते. सैफचं घर आणि वाद्रा येथील लकी हॉटेलमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजवरून असं समोर आलं की आरोपीने हल्ल्यानंतर आपला गेटअप बदलला. या हल्लेखोराने मध्यरात्री दोन ते अडीचदरम्यान सैफवर हल्ला केला, त्यानंतर तो सकाळी आठ वाजेपर्यंतच वांद्रा परिसरातच फिरत होता. मात्र तरी देखील पोलिसांना या आरोपीला पकडण्यात यश आलं नाही. पोलिसांना चकमा देण्यासाठी आरोपी ज्याप्रकारे कपडे बदलत आहे, त्यावरून त्याच्यावर कुठल्यातरी क्राइम वेबसिरीज किंवा क्राइम फिल्मचा प्रभाव असल्याचं दिसतंय. आरोपीचे कुटुंबीय किंवा मित्रपरिवाराचाही माग काढण्यात पोलिसांना यश आलेले नाही. सध्या मुंबई पोलिस आणि गुन्हे शाखेची जवळपास 30 पथके आरोपींचा शोध घेत आहेत. मुंबई पोलिसांना आरोपीचे रोज नवनवीन फोटो आणि सीसीटीव्ही फुटेज मिळत असले तरी आरोपी अद्याप फरार असून त्या कुठेही मागमूस लागत नाहीये.
