आलियाने लग्नात बोलावलं नाही..; काका मुकेश भट्ट यांचा खुलासा, राहाला पाहण्यासाठी आसुसले डोळे
निर्माते मुकेश भट्ट हे महेश भट्ट यांचे धाकटे भाऊ आणि अभिनेत्री आलिया भट्टचे काका आहेत. गेल्या काही वर्षांपासून त्यांच्यात कौटुंबिक वाद सुरू आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मुकेश या वादावर मोकळेपणे व्यक्त झाले.

निर्माते मुकेश भट्ट यांनी भाऊ महेश भट्ट यांच्यासोबत मिळून अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते त्यांच्या कौटुंबिक वादावर आणि खासगी आयुष्यावर मोकळेपणे व्यक्त झाले. महेश आणि मुकेश भट्ट यांनी मिळून ‘आशिकी’, ‘सडक’, ‘मर्डर’ आणि ‘राज’ यांसारखे हिट चित्रपट बॉलिवूडला दिले. परंतु 2021 मध्ये एका वादानंतर दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले. तेव्हापासून या भावंडांमध्ये दुरावा आहे. इतकंच नव्हे तर भाची आलिया भट्टने तिच्या लग्नालाही बोलावलं नव्हतं, असा खुलासा मुकेश यांनी या मुलाखतीत केला आहे. आलिया आणि रणबीर कपूर यांची मुलगी राहा कपूरलासुद्धा ते आजवर भेटले नाहीत.
‘लेहरें रेट्रो’ला दिलेल्या मुलाखतीत मुकेश भट्ट म्हणाले, “जर मी म्हटलं की मला वाईट वाटलं नाही तर मी पाखंडी वाटेन. अर्थात मला वाईट वाटलं. मी आलियावर खूप प्रेम करतो. फक्त तिच्यावरच नाही तर मी शाहीनवरही खूप प्रेम करतो. त्यामुळे जेव्हा तिचं लग्न झालं, तेव्हा मला वाटलं की माझ्या मुलीचं लग्न आहे. मला तिच्या लग्नाला जायचं होतं. जेव्हा मला समजलं की आलिया गरोदर आहे आणि तिला मुलगी झाली, तेव्हा राहाला बघण्यासाठी, भेटण्यासाठी माझे डोळे तरसले होते. मला लहान मुलं खूप आवडतात. मी आजवर राहाचा चेहरासुद्धा पाहिला नाही. आता ती तीन वर्षांची होणार आहे. तरीसुद्धा मी अद्याप तिला भेटलो नाही.”
जेव्हा त्यांना विचारलं गेलं की त्यांनी आलियाला पुन्हा भेटण्याचा प्रयत्न केला का? त्यावर मुकेश यांनी सांगितलं की, आलियाबद्दल आदर असल्याने त्यांनी तसं करण्यास नकार दिला. “मी प्रयत्नही केला नाही, कारण मला तिला कोणत्याही विचित्र किंवा अवघड परिस्थितीत टाकायचं नव्हतं. मी तिला मेसेज केला नाही, पण तिच्यासाठी मी मनापासून प्रार्थना केल्या आहेत.”, असं त्यांनी पुढे सांगितलं.
विशेष फिल्म्स बॅनरअंतर्गत अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन करणाऱ्या विक्रम भट्ट यांनी महेश आणि मुकेश भट्ट यांच्यातील तणावपूर्ण संबंधांविषयी एका मुलाखतीत खुलासा केला होता. सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले होते, “भट्ट साहेबांनी मला सांगितलं होतं की, तू कंपनीतून निघून जा. मी त्यांना विचारलं की काय झालं? तेव्हा त्यांनी सांगितलं की, कित्येक वर्षांपासून भावाने (मुकेश भट्ट) माझं शोषण केलं आहे. त्याने तुझंही शोषण करावं अशी माझी इच्छा नाही. तू इथून बाहेर पडून स्वत:चं काहीतरी कर. मला तेच करावं लागलं जे बॉसने (मुकेश) मला सांगितलं होतं.”
