तमन्नाच्या फिगरवर 69 वर्षीय अनु कपूरची अशी टिप्पणी, भडकले नेटकरी, म्हणाले ‘घरी आई-बहिण..’
अभिनेत्री तमन्ना भाटियाचं 'आज की रात' हे गाणं सोशल मीडियावर तुफान गाजलं होतं. याच गाण्यावरून टिप्पणी करताना अनु कपूर यांनी मर्यादा ओलांडली आहे. त्यांची ही मुलाखत आता चर्चेत आली असून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

अभिनेत्री तमन्ना भाटियाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्येही आपली विशेष छाप सोडली आहे. सध्या ती विविध हिंदी चित्रपटांमधील आयटम साँग्समुळे चर्चेत आली आहे. ‘स्त्री 2’मधील ‘आज की रात’ हे तिचं गाणं तुफान गाजलं. आता अभिनेते अनु कपूर यांनी या गाण्याची एक क्लिप पाहून त्यावर कमेंट केली. त्याच कमेंटवरून आता नेटकरी त्यांच्यावर टीका करत आहेत. अनु कपूर यांनी शुभांकर मिश्राच्या युट्यूब चॅनलला नुकतीच मुलाखत दिली. त्यात त्यांनी तमन्ना भाटियाचं कौतुक केलं. परंतु हे कौतुक त्यांनी ज्या शब्दांत केलं, ते ऐकून नेटकरी भडकले आहेत.
मुलाखतकर्त्याने अनु कपूर यांना विचारलं की त्यांना तमन्नाचं ‘आज की रात’ हे गाणं आवडलं का? त्यावर त्यांनी लगेच उत्साहात उत्तर दिलं की, “माशाअल्लाह, काय मिल्की फिगर आहे!” हे ऐकल्यानंतर होस्टने सांगितलं की, हे गाणं ऐकून लहान मुलं लगेच झोपून जातात. तेव्हा अनु कपूर पुढे मिश्किलपणे म्हणतात, “कोणत्या वयाची मुलं झोपून जातात. 70 वर्षांचा लहान मुलगा असू शकतो ना? मी तिथे असतो तर हाच प्रश्न विचारला असता की कोणत्या वयातील मुलं झोपतात? इंग्रजीत बोलतात, तो 70 वर्षांचा मुलगा आहे आणि हा 11 वर्षांचा वृद्ध आहे. बहीण तिच्या गाण्याने, तिच्या शरीराने, तिच्या मिल्की चेहऱ्याने आमच्या मुलांना झोपवते. चांगली गोष्ट आहे. जर आपल्या देशातील मुलांची चांगली झोप होत असेल तर देशावर मोठी कृपा होईल. जर आणखी काही इच्छा असतील तर मग त्या देवच पूर्ण करो.”
अनु कपूर यांचं हे वक्तव्य ऐकून नेटकऱ्यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘तुम्ही तुमच्या मुलीसाठी असे शब्द वापरणार का’, असा सवाल एकाने केला. तर ‘तुमच्या घरात मुली किंवा महिला नाहीत का’, असं दुसऱ्याने विचारलंय. ‘ही अत्यंत अश्लील टिप्पणी आहे’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी राग व्यक्त केला आहे. 69 वर्षीय अनु कपूर एखाद्या अभिनेत्रीबद्दल अशी टिप्पणी कशी करू शकतात, असा प्रश्न नेटकरी करत आहेत.
