‘छावा’ फूड पाडणारा सिनेमा म्हणणाऱ्या ए. आर. रेहमान यांच्यावर जोरदार टीका; ट्रोलर्सना अखेर मुलींनी सुनावलं
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रेहमान यांनी गेल्या आठ वर्षांत हिंदी चित्रपटसृष्टीत झालेल्या बदलांचा उल्लेख करत अलिकडे काम कमी मिळत असल्याचं म्हटलं होतं. यात त्यांनी सांप्रदायिकचाही मुद्दा मांडला होता. तर विकी कौशलचा 'छावा' हा चित्रपट फूट पाडणारा असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं होतं.

ऑस्कर विजेते संगीतकार ए. आर. रेहमान यांच्या काही वक्तव्यांवरून सध्या देशभरातून जोरदार टीका होत आहे. फिल्म इंडस्ट्री सांप्रदायिक होत चालली असून त्यामुळे मंदी आल्याचं मत रेहमान यांनी एका मुलाखतीत नोंदवलं होतं. तर विकी कौशलचा ‘छावा’ हा चित्रपट फूट पाडणारा असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. या वक्तव्यांनंतर झालेल्या टीकेचा विचार करता त्यांनी नंतर स्पष्टीकरणसुद्धा दिलं. मात्र त्यानंतरही सोशल मीडियाद्वारे प्रचंड ट्रोलिंग सुरू आहे. या ट्रोलिंगला वैतागून अखेर रेहमान यांच्या दोन्ही मुली त्यांच्या समर्थनार्थ समोर आल्या आहेत. खतिजा आणि रहिमा यांनी इन्स्टा स्टोरीवर मल्याळम संगीतकार कैलास मेनन यांनी त्यांच्या वडिलांसाठी लिहिलेली एक पोस्ट शेअर केली आहे.
‘ए. आर. रेहमान यांनी त्यांच्या मनातील गोष्टी सांगितल्याबद्दल त्यांना दोष देणारे लोक एक मूलभूत गोष्ट विसरत आहेत की, त्यांनी फक्त त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तो त्यांचा अधिकार आहे. तुम्ही त्यांच्याशी असहमत असाल, पण त्यांना त्यांचे अनुभव व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे. ते तुम्ही नाकारू शकत नाही. परंतु त्यानंतरही जे घडलं ते मतभेदांच्या पलीकडे आणि चारित्र्यहननापर्यंत गेलंय. जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित कलाकाराचं अनादर करणं, त्यांच्या श्रद्धेवर प्रश्न उपस्थित करणं, त्यांच्या कामाची थट्टा करणं आणि त्यांच्या आयुष्यातील अनुभवांना ‘व्हिक्टिम कार्ड’ ठरवणं ही टीका नाही. तर ही मतं म्हणून सादर केलेली द्वेषपूर्ण टिप्पणी आहे’, असं या पोस्टमध्ये म्हटलंय.

कैलाश यांनी पोस्टमध्ये पुढे लिहिलंय, ‘हा काही सर्वसामान्य आवाज नाही. ही अशी व्यक्ती आहे, ज्यांनी भारतीय संगीताला जगभरात नेलं आणि देशाचं प्रतिष्ठेनं प्रतिनिधित्व केलं. आपल्या कामाद्वारे त्यांनी पिढ्या घडवल्या आहेत. एखाद्या कलाकाराने त्यांचं वैयक्तिक मत व्यक्त केलं म्हणून तमिळ संस्कृती, भारतीय चित्रपट आणि जागतिक संगीतातील त्यांचं दशकांचं योगदान संपत नाही. तुम्ही चित्रपटाबद्दलच्या त्यांच्या मतावर वाद घालू शकता. तुम्ही त्यांच्या वक्तव्याशी असहमत असू शकता. हे सर्व ठीक आहे. पण सार्वजनिकरित्या त्यांचा अपमान करणं किंवा त्यांच्या प्रामाणिकपणावर शंका घेणं हे चुकीचं आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य जितकं रेहमान यांना लागू आहे, तितकंच ते त्यांच्या टीकाकारांनाही लागू आहे.’ ए. आर. रेहमान यांच्या मुलगी खतिजा आणि रहिमा यांनी ही पोस्ट त्यांच्या इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर करत टाळ्या वाजवण्याचा इमोजी पोस्ट केला आहे.
