1986 ची कथा, पटकथा लिहिण्यासाठी लागली 9 वर्षे, बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाच्या पहिल्या चित्रपटाविषयी सर्वकाही..
अनुराग कश्यप दिग्दर्शित 'निशांची' हा चित्रपट येत्या 19 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची टक्कर 'जॉली एलएलबी 3'शी होणार आहे. बाळासाहेब ठाकरेंचा नातू ऐश्वर्य ठाकरे या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

बाळासाहेब ठाकरे यांचा नातू ऐश्वर्य ठाकरे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याचा ‘निशांची’ हा चित्रपट येत्या 19 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. अनुराग कश्यप दिग्दर्शित या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. ऐश्वर्य हा स्मिता ठाकरे आणि जयदेव ठाकरे यांचा मुलगा आहे. चित्रपटासाठी निवड करण्यापूर्वी तो ‘ठाकरे’ आहे किंवा ‘महाराष्ट्रीयन’ आहे हे माहीत नसल्याचा खुलासा अनुरागने एका मुलाखतीत केला होता. ‘निशांची’ या चित्रपटात दोघा भावांची कथा दाखवण्यात आली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही भावांची भूमिका ऐश्वर्यच साकारणार आहे. म्हणजेच तो या चित्रपटात दुहेरी भूमिकेत आहे.
ऐश्वर्यच्या कुटुंबाती राजकीय पार्श्वभूमी आहे, परंतु त्याने अभिनयविश्वात करिअर करण्याचं ठरवलं आहे. 2015 मध्ये त्याने संजय लीला भन्साळी यांच्या ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. गेल्या काही वर्षांपासून तो अभिनयावर अधिक लक्ष केंद्रीत करत आहे. या चित्रपटाविषयी अनुराग कश्यप म्हणाला, “आम्ही 2016 मध्ये या चित्रपटाची पटकथा लिहिली होती. उत्तर भारतात आम्ही ज्या प्रकारचे चित्रपट पाहून मोठे झालो, त्याच आठवणींना उजाळा द्यायचा होता. कानपूरमध्ये या चित्रपटाचा सेट बनवणं आम्हाला खूप रंजक वाटलं. तिथल्या हिंदीचा एक वेगळाच लहेजा आहे, एक वेगळीच गोष्ट आहे. आम्हाला त्याच प्रकारचे संवादफेक आणि भावना अपेक्षित होत्या. कारण हा चित्रपट भावनिकदृष्ट्या खूप तगडा आहे. एक आई आणि तिच्या दोन्ही मुलांच्या कौटुंबिक नात्यांची कथा यात पहायला मिळणार आहे. दोघं भाऊ एकाच मुलीवर प्रेम करतात.”
View this post on Instagram
1986 च्या काळातील कहाणी
या चित्रपटाची कथा 1986 पासून सुरू होते आणि 2016 मध्ये संपते. केंद्रस्थानापासून याच्या कहाणीला सुरुवात होते आणि पुढे त्याच्या आसपासचं जग कशा पद्धतीने बदलतं, हे तुम्हाला पहायला मिळतं. आम्ही भूमिकांमध्ये, अभिनयात आणि कथेत प्रामाणिकपणा शोधत होतो.
ऐश्वर्यला कशी मिळाली ऑफर?
या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी अनुराग कश्यप एका नव्या चेहऱ्याच्या शोधात होता. त्याने ऐश्वर्यचा एक व्हिडीओ पाहिला, ज्यामध्ये तो ‘शूल’ या चित्रपटातील इरफान आणि मनोज वाजपेयी यांचा मोनोलॉग म्हणत होता. हा मोनोलॉग तो इतक्या सहजतेने म्हणाला होता की ते पासून ऐश्वर्य उत्तर भारताचा असल्याचं अनुरागला वाटलं होतं. नंतर जेव्हा त्यांची भेट झाली, तेव्हा ऐश्वर्यने त्याच्या कौटुंबिक पार्श्वभूमीविषयी माहिती दिली.
