Bhook Chuk Maaf : थिएटनंतर ओटीटीवर आला ‘भूल चूक माफ’; कुठे पाहू शकता?
राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट थिएटरनंतर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने दोन आठवड्यांपर्यंत बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. प्रेक्षकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

दिनेश विजन निर्मित नुकताच प्रदर्शित झालेला ‘भूल चूक माफ’ हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा या वर्षातील पहिला असा चित्रपट आहे, जो थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर महिनाभरातच ओटीटीवर आला आहे. करण शर्मा दिग्दर्शित ‘भूल चूक माफ’ हा चित्रपट 9 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता. परंतु पहलगाममधील दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूर यांमुळे त्याचं प्रदर्शन लांबणीवर गेलं होतं. परिस्थितीचा विचार करत निर्मात्यांनी आधी हा चित्रपट थेट ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा विचार केला होता, तेसुद्धा अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाल्यानंतर. त्यानंतर पीव्हीआर, आयनॉक्स यांनी कोर्टात धाव घेतली होती. अखेर हायकोर्टाने थिएटर मालकांच्या बाजूने निर्णय दिला आणि 23 मे रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. आता त्याच्या 14 दिवसांनंतर म्हणजेच प्रदर्शनाच्या दुसऱ्याच आठवड्यात हा चित्रपट ओटीटीवर आला आहे.
राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ (Amazon Prime Video) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होत आहे. राजकुमार आणि वामिका यांनी सोशल मीडियावर याबद्दलचा व्हिडीओ शेअर केला आहे. ‘पहायला विसरू नका’ असं कॅप्शन देत त्यांनी ओटीटी रिलीजची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाने अवघ्या दोन आठवड्यांतच बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली होती. प्रेक्षकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत होता. ‘भूल चूक माफ’ या चित्रपटाने 14 दिवसांत 66.75 कोटी रुपयांची कमाई केली होती. तर चौदाव्या दिवशी कमाईचा आकडा 1.65 कोटी रुपये इतका होता. याआधी वीकेंड नसतानाही या चित्रपटाने चांगली कमाई केली.
View this post on Instagram
बॉक्स ऑफिस रिपोर्ट-
पहिला दिवस (शुक्रवार)- 7 कोटी रुपये दुसरा दिवस (शनिवार)- 9.5 कोटी रुपये तिसरा दिवस (रविवार)- 11.5 कोटी रुपये चौथा दिवस (सोमवार)- 4.5 कोटी रुपये पाचवा दिवस (मंगळवार)- 4.75 कोटी रुपये
या चित्रपटाची कथा वाराणसीतील असून त्यात रंजन (राजकुमार) आणि तितली (वामिका गब्बी) यांची कथा दाखवण्यात आली आहे. हे दोघं एकमेकांच्या प्रेमात वेडे असून त्यांना एकमेकांशी लग्न करायचं आहे. परंतु तितलीशी लग्न करण्याआधी रंजनला सरकारी नोकरी मिळवायची आहे. सर्वकाही ठीक सुरू असतानाच तो भगवान शंकराला दिलेलं एक वचन मोडतो. त्यानंतर जे काही घडलं, त्याची रंजक कथा यात दाखवण्यात आली आहे.
