Bigg Boss 19 : प्रीमिअरच्या आधी स्पर्धकांची नावं जाहीर; चेहरे पाहून तुम्हालाही बसेल धक्का!
बिग बॉसच्या प्रीमिअरची उत्सुगता आता शिगेला पोहोचली आहे. आजपासून (24 ऑगस्ट) बिग बॉसचा एकोणिसाव्या सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी निर्मात्यांनी तीन नवीन प्रोमो प्रदर्शित केले असून त्यात काही स्पर्धकांची नावं समोर आली आहेत.

छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रिॲलिटी शो ‘बिग बॉस’चा नवीन सिझन आजपासून (24 ऑगस्ट) सुरू होत आहे. यंदाच्या सिझनमध्ये बरेच बदल करण्यात आले असून त्यात कोणकोणते स्पर्धक सहभागी होणार आहेत, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुकत आहेत. अशातच निर्मात्यांनी सोशल मीडियावर प्रोमो प्रदर्शित करत काही स्पर्धकांची नावं जवळपास कन्फर्म केली आहेत. ‘बिग बॉस 19’ची घोषणा झाल्यापासून यामध्ये कोण झळकणार, याविषयी नेटकऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली होती. रविवारी रात्री 9 वाजता या शोचा प्रीमिअर प्रसारित केला जाणार आहे. कोणकोणते स्पर्धक बिग बॉसच्या घरात राहायला जातील, हे प्रिमिअरमध्येच स्पष्ट होणार आहे. परंतु त्यापूर्वी काही नावं आता समोर आली आहेत.
बिग बॉसच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर पोस्ट केलेल्या प्रोमोमध्ये तीन कलाकारांची नावं समोर आली आहेत. यामध्ये आवेज दरबार, नगमा मिराजकर, अमाल मलिक आणि गौरव खन्ना यांचा समावेश आहे. या प्रोमोमध्ये स्पर्धकांचे पूर्ण चेहरे स्पष्ट पहायला मिळत नाहीत. परंतु स्पर्धकांची झलक पाहून नेटकऱ्यांनी त्यांचा अंदाज वर्तवला आहे. प्रोमोमध्ये सर्वांत आधी आवेज दरबार आणि नगमा मिराजकर यांची नावं समोर आली. या जोडीचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. त्यांची केमिस्ट्री लोकांना खूप आवडते. परंतु या दोघांच्या नात्यात काही समस्या असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे बिग बॉसच्या घरात दोघं कसे राहणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
View this post on Instagram
शोच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रोमोमध्ये टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध चेहरा गौरव खन्नाचं नाव समोर आलं आहे. गौरवने ‘अनुपमा’ मालिकेत अनुजची भूमिका साकारली होती. त्यातून त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ इंडिया’ या कुकिंग शोमध्येही त्याने विशेष छाप सोडली आहे. त्यानंतर संगीतकार आणि प्रसिद्ध गायक अमाल मलिकच्या चेहऱ्याची झलक पहायला मिळते. अमाल त्याच्या खासगी आयुष्यामुळे काही दिवसांपूर्वी चर्चेत होता. भाऊ आणि आईवडिलांसोबत सर्व संबंध तोडत असल्याचं त्याने जाहीर केलं होतं. नंतर त्याने ही पोस्ट डिलिट केली होती. अमाल मलिक आणि संगीतकार अनु मलिक यांचे कौटुंबिक संबंध आहेत.
View this post on Instagram
एकेकाळी टीव्ही इंडस्ट्रीत सर्वांत लोकप्रिय स्टार बनलेली अशनूर कौरसुद्धा या सिझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होणार असल्याचं कळतंय. टीव्ही अभिनेता बशीर अली, अभिषेक बजाज, हुनर हाले आणि शफर नाजसुद्धा ‘बिग बॉस 19’मध्ये भाग घेणार आहेत.
