ममता कुलकर्णीची महामंडलेश्वर पदावरून हकालपट्टी झाल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्री स्पष्टच बोलली..
अभिनेत्री ममता कुलकर्णीला किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदावरून हटवल्यानंतर 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत आली आहे. तब्बल 25 वर्षांनंतर भारतात परतल्यानंतर ममताने महाकुंभमध्ये संन्यास घेतला. त्यानंतर तिला महामंडलेश्वर पदवी देण्यात आली.

अभिनेत्री ममता कुलकर्णीला किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर पदवी दिल्यावरून वाद निर्माण झाला होता. यावरून आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी आक्षेप घेत किन्नर आखाड्याच्या आचार्य महामंडलेश्वरपदावरून ममतासह लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनाही पदमुक्त करण्याची घोषणा केली. त्रिपाठी यांनी सनातन धर्म आणि देशहित बाजूला ठेवून देशद्रोहाचे आरोप असलेल्या ममता कुलकर्णीला आखाड्याच्या नियमांचे पालन न करता थेट महामंडलेश्वरपदी पट्टाभिषेक केला, असा आरोप दास यांनी केला. या घटनेवर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अशातच ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री पवित्रा पुनियाची प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. पवित्राने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये याविषयीची पोस्ट लिहिली आहे.
ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर पदावरून हटवल्याची बातमी शेअर करत पवित्राने त्यावर लिहिलं, ‘परफेक्ट’ (योग्य). म्हणजेच ममताला त्या पदावरून काढल्याच्या निर्यणाचं पवित्राने समर्थन केलंय. आणखी एका स्टोरीमध्ये पवित्राने एका इन्स्टाग्राम युजरचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये संबंधित युजर हा ममतासोबत नेमकं काय घडलं आणि तिला पदावरून का हटवलं, याबद्दलची सविस्तर माहितीन देताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यावर पवित्राने लिहिलं, ‘बरोबर म्हटलंस.’




24 जानेवारी रोजी महामंडलेश्वर स्वामी महेंद्रानंद गिरी, आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी आणि अन्य किन्नर महामंडलेश्वरांच्या उपस्थितीत ममता कुलकर्णीची किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर म्हणून नियुक्ती करण्यात आली. यावेळी ममताचे नाव श्री यमाई ममता नंद गिरी असं बदलण्यात आलं होतं. दरम्यान, त्रिपाठी यांनीही एख पत्रकार परिषद घेत दास यांचे आरोप फेटाळले आहेत आणि ममता कुलकर्णी महामंडलेश्वरपदी राहणार असल्याचं स्पष्ट केलं.
तब्बल 25 वर्षांनंतर भारतात परतलेल्या ममता कुलकर्णीने उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभ 2025 मध्ये तिने पिंडदान करत संन्यास घेतला होता. त्यानंतर एका भव्य पट्टाभिषेक कार्यक्रमात तिला किन्नर अखाड्याचं महामंडलेश्वर बनवण्यात आलं. मात्र या सर्व घटनेवरून इतर साधूसंतांनी प्रश्न उपस्थित केले होते. एका महिलेला किन्नर अखाड्याचं महामंडलेश्वर का बनवण्यात आलं, यावरून वाद सुरू झाला. यापूर्वी किन्नर कथावाचक हिमांगी सखी यांनीदेखील ममताच्या पदवीवर आक्षेप घेतला होता. तर योगगुरू बाबा रामदेव यांनी ममताचं नाव न घेता तिच्यावर टीका केली होती. ‘एका दिवसात कोणी साधू संत बनत नाही’, असं ते म्हणाले होते.