करिअरमध्ये फक्त या दिग्दर्शकाने बनवले 3 चित्रपट, एकासाठी लावले 14 वर्षे, पण ठरला प्रचंड सुपरहिट
‘मुगल-ए-आजम’ बनवण्यासाठी दिग्दर्शकाने घेतली तब्बल 14 वर्षे; अनेक अडथळे आले, पण स्वप्नातील सिनेमा अखेर पडद्यावर आणलाच. प्रदर्शित होताच ठरला प्रचंड सुपरहिट.

आज एखादा बिग बजेट सिनेमा पूर्ण होण्यासाठी दोन-तीन वर्षे लागली तरी तो बराच वेळ मानला जातो. मात्र, हिंदी सिनेसृष्टीत असे एक दिग्दर्शक होऊन गेले, ज्यांनी आपला ड्रीम प्रोजेक्ट पडद्यावर आणण्यासाठी तब्बल 14 वर्षे मेहनत घेतली. हा सिनेमा म्हणजे भारतीय सिनेसृष्टीतील अजरामर कलाकृती ‘मुगल-ए-आजम’.
के. आसिफ यांनी 1946 मध्ये या चित्रपटावर काम सुरू केलं. सुरुवातीला शिराज अली हकीम हे चित्रपटाचे निर्माते होते. मात्र, 1947 च्या फाळणीनंतर ते पाकिस्तानात गेल्याने चित्रपटाचं काम थांबलं. त्यानंतर उद्योगपती शापूरजी पालोनजी या प्रकल्पाशी जोडले गेले आणि चित्रपटाचं काम पुन्हा सुरू झालं. अखेर 5 ऑगस्ट 1960 रोजी ‘मुगल-ए-आजम’ प्रदर्शित झाला.
सुरुवातीची स्टारकास्टही होती वेगळी
आज ‘मुगल-ए-आजम’ म्हटलं की पृथ्वीराज कपूर, दिलीप कुमार आणि मधुबाला हीच नावं डोळ्यासमोर येतात. मात्र, सुरुवातीला या चित्रपटासाठी चंद्रमोहन, डी.के. सप्रू आणि नरगिस यांची निवड करण्यात आली होती. पुढे अनेक कारणांमुळे कलाकार बदलले आणि अखेर पृथ्वीराज कपूर, दिलीप कुमार आणि मधुबाला या कलाकारांनी ऐतिहासिक भूमिका साकारल्या.
के. आसिफ आपल्या कामातील बारकावे आणि परफेक्शनसाठी प्रसिद्ध होते. ‘मुगल-ए-आजम’मधील भव्य शीश महलचा सेट, युद्धाची दृश्यं आणि प्रत्येक फ्रेमवर त्यांनी विशेष मेहनत घेतली.
युद्धाच्या दृश्यांसाठी भारतीय सैन्यातील जवानांसह मोठ्या संख्येने घोडे आणि उंटांचा वापर करण्यात आला होता. तर ‘प्यार किया तो डरना क्या’ या गाण्याच्या चित्रीकरणावर त्या काळात तब्बल 10 लाख रुपये खर्च झाल्याचं सांगितलं जातं. विशेष म्हणजे, त्यावेळी एवढ्या बजेटमध्ये एक संपूर्ण चित्रपट तयार होऊ शकत होता.
65 वर्षांनंतरही ‘मुगल-ए-आजम’ची जादू कायम
1960 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मुगल-ए-आजम’ला आज 65 वर्षे पूर्ण झाली असली तरी त्याची भव्यता, संवाद, संगीत आणि दिग्दर्शनाची चर्चा आजही होते. आपल्या स्वप्नातील चित्रपटासाठी 14 वर्षे झटणाऱ्या के. आसिफ यांनी अखेर भारतीय सिनेमाला अशी कलाकृती दिली, जी आजही हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात महत्त्वाकांक्षी आणि संस्मरणीय चित्रपटांपैकी एक मानली जाते.
