सैफ प्रकरणात नवा ट्विस्ट, फॉरेन्सिक एक्सपर्टचा धक्कादायक दावा; सैफवरील हल्ला चाकूने नव्हे…
सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात आतापर्यंत अनेक नवीन खुलासे झाले आहेत. आरोपीचा दावा आहे की तो हल्ल्यात सामील नव्हता आणि सीसीटीव्ही फुटेजमधील व्यक्ती तो नाही. फॉरेन्सिक तज्ञांनीसुद्धा हल्ल्यात चाकू वापरला नव्हता असा दावा केला आहे.

अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्यातील चौकशीत रोज नवीन ट्विस्ट येत आहे. आधी आरोपीने आपण सैफवर हल्ला केलाच नसल्याचा दावा केला आहे. सीसीटीव्हीत दिसणारा व्यक्ती वेगळा आहे. तो मी नाहीच, असा दावा त्याने केला. त्यानंतर सैफ अली खानच्या घरात जे फिंगर प्रिट मिळाले त्याच्याशी आरोपीच्या हाताचे ठसे जुळत नसल्याचं समोर आलं आहे. या दोन गोष्टींमुळे पोलीस चक्रावून गेलेले असतानाच आता सैफ अली खानवर चाकूने हल्ला झालाच नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
एका इंग्रजी दैनिकाने फॉरेन्सिक एक्सपर्ट प्रा. दिनेश राव यांच्या हवाल्याने एक मोठा आणि धक्कादायक दावा केला आहे. लीलावती रुग्णालयाच्या मेडिको-लीगल रिपोर्टमध्ये (एमएलसी) ज्या जखमांचा उल्लेख केला आहे, त्या चाकू हल्ल्याने झालेल्या जखमांसारख्या नाहीत. त्यांनी असा दावा देखील केला की डॉक्टर भार्गवी पाटिल यांच्या स्वाक्षरी केलेल्या रिपोर्टमध्ये ज्या जखमांचा उल्लेख केला आहे, त्या जखमा फक्त बोथट हत्यारानेच होऊ शकतात.
तो चाकू नव्हता?
सैफ अली खानच्या पेंटहाऊसमध्ये काम करणाऱ्या स्टाफ नर्सनेही याबाबतची माहिती दिली आहे. हल्लेखोराने त्याच्यासोबत एक छडीसारखी वस्तू आणि पातळ करवतीसारखी वस्तू घेऊन आला होता, असं या नर्सचं म्हणणं आहे. दुसरीकडे, सैफ अली खानच्या मणक्याजवळून 2.5 इंचाचा चाकूचा तुकडा काढला आहे, असा दावा लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी केला आहे. या चाकूचे चित्र सोशल मीडियावर देखील व्हायरल झाली आहेत. तथापि, प्रोफेसर दिनेश राव यांच्या या दाव्यावर रुग्णालयाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
आरोपीचा धक्कादायक खुलासा
दरम्यान, आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लामने आणखी एक कबूली दिल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. त्याने शाहरुख खानच्या घरी देखील चोरी करण्याचा प्रयत्न केला होता, पण तेथे तो अपयशी झाला. यामुळे त्याने दुसऱ्या घरात चोरी करण्याची योजना केली होती. त्याला पैशांची आवश्यकता होती. त्याला काही दस्तऐवज बनवायचे होते, असा दावा पोलिसांनी केला आहे. चौकशी दरम्यान आरोपीने ही कबुली दिल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
चोरीचा प्लान का केला?
त्याला कोणीतरी भारतीय दस्तऐवज बनवून देणार होते आणि त्याच्या बदल्यात पैसे मागितले होते. त्याला आधार कार्ड आणि इतर दस्तऐवज बनवण्यासाठी पैशाची आवश्यकता होती. ज्यासाठी त्याने चोरी करण्याची योजना आखली होती, असंही त्याने चौकशीत कबूल केल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. आरोपीला भारतीय नागरीक असल्याचे कागदपत्र बनवून देण्याचं आश्वासन देणाऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.
