पाकिस्तानच्या लोकसंख्येपेक्षा जास्त भारतात होते बकऱ्यांची कत्तल? ‘बॉर्डर 2’मधील सनी देओलच्या डायलॉगमुळे वाद, सत्य काय?
सनी देओलचा बहुचर्चित 'बॉर्डर 2' हा चित्रपट येत्या 23 जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमधील सनी देओलचा एक डायलॉग सध्या तुफान चर्चेत आहे. जितने तुम्हारे पाकिस्तान में लोक नहीं, उतने हमारे हिंदुस्तान में ईद पर बकरे कटते है, असा हा डायलॉग आहे.

सनी देओलच्या ‘बॉर्डर 2’ या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला दमदार प्रतिसाद मिळाला असून ॲडव्हान्स बुकिंगसुद्धा जोरदार सुरू आहे. सध्या सोशल मीडियावर ट्रेलरमधील सनी देओलचा एक डायलॉग तुफान चर्चेत आहे. “जितने तुम्हारे पाकिस्तान में लोक नहीं, उतने हमारे हिंदुस्तान में ईद पर बकरे कटते है,” असा हा डायलॉग आहे. परंतु या डायलॉगवरून काही नेटकऱ्यांनी प्रश्नसुद्धा उपस्थित केला आहे. खरंच भारतात ईदला किती बकऱ्या कापल्या जातात, असा सवाल नेटकरी विचारत आहेत. या मुद्द्यावर सरकार कधीच स्पष्ट आकडेवारी देत नाही, परंतु ईदला किती बकऱ्या खरेदी केल्या जातात, याची आकडेवारी निश्चितच उपलब्ध आहे.
बकऱ्यांच्या कत्तलीबाबत डेटा काय सांगतो?
2023 मध्ये मुंबई महानगरपालिकेनं शेअर केलेल्या डेटानुसार, मुंबईच्या देवनार कत्तलखान्यातून फक्त एका आठवड्यात 1,68,000 हून अधिक शेळ्या आणि मेंढ्या विकल्या गेल्या आहेत. याच अहवालात असंही म्हटलंय की विविध राज्यांमधून 1,77,278 शेळ्या आणि मेंढ्या देवनार कत्तलखान्यात विक्रीसाठी आणण्यात आल्या होत्या. तिथेही 1,68,498 जनावरं विकली गेली. मुंबईतील देवनार मंडी इथं आशियातील सर्वांत मोठा कत्तलखाना आहे. गेल्या वर्षी ईद अल-अधाच्या काही दिवस आधी तिथं दीड लाखांहून अधिक प्राणी आणण्यात आले होते. फक्त मुंबईतच नाही तर देशातील इतरही मोठ्या राज्यांमध्ये लाखो बकऱ्यांची विक्री झाली. लखनौच्या जॉगर्स पार्क, दुबग्गा, लेमन पार्क, हार्डिंग ब्रिज, खुरमननगर आणि मौलवीगंज इथं बकऱ्यांचे बाजार भरले होते. एका रिपोर्टनुसार, या बाजारात बकऱ्यांच्या किंमती 10 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंत होत्या.
पाकिस्तानची लोकसंख्या
1971 च्या युद्धादरम्यान पाकिस्तानची लोकसंख्या 61.8 दशलक्ष होती. सध्याचा विचार केला तर पाकिस्तानची लोकसंख्या सुमारे 25 कोटी आहे. त्यामुळे ‘बॉर्डर 2’मधील सनी देओलचा डायलॉग हा केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने अतिशयोक्तीने लिहिण्यात आला आहे, असं म्हणायला हरकत नाही. भारतात ईदच्या दिवशी बकऱ्यांचा बळी दिला जातोच, पण जगातील इतर अनेक देशांमध्येही हे मोठ्या प्रमाणात घडतं. आणखी एका रिपोर्टनुसार जगभरात ईद-उल-अधाच्या वेळी दरवर्षी सुमारे 5 कोटी प्राण्यांचा बळी दिला जातो. यामध्ये बकऱ्या, मेंढ्या, गायी, म्हशी आणि उंट यांसारख्या प्राण्यांचा समावेश असतो.
‘बॉर्डर 2’ हा जे. पी. दत्ता यांच्या ‘बॉर्डर’ या चित्रपटाचा सीक्वेल आहे. यामध्ये सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांच्या भूमिका आहेत.
