निर्भयासारखी अवस्था करेन, गुप्तांगात..; पतीच्या धमकीबद्दल सेलिना जेटलीचा धक्कादायक खुलासा
अभिनेत्री सेलिना जेटलीने तिच्या पतीविरोधात गंभीर आरोप करत खटला दाखल केला आहे. सेलिनाने 2011 मध्ये पीटर हागशी लग्न केलं होतं. या दोघांना तीन मुलं आहेत. सेलिनाने घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत पतीविरुद्ध न्यायालयात तक्रार दाखल केली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सेलिना जेटलीने तिचा पती पीटर हागवर अत्यंत गंभीर आरोप करत खटला दाखल केला आहे. मारहाण, शारीरिक छळ, कौटुंबिक हिंसाचार, संपत्ती हडपणं यांसारखे आरोप सेलिनाने पीटरवर केले आहेत. सेलिनाने 2011 मध्ये पीटरशी लग्न केलं होतं. या दोघांना तीन मुलं आहेत. पतीच्या अत्याचारामुळे ऑस्ट्रेलियातील घर सोडून भारतात परतावं लागल्याचा खुलासा सेलिनाने तिच्या याचिकेत केला आहे. सेलिनाने पतीवर पाच गंभीर आरोप केले आहेत.
मुलांसमोर शिवीगाळ
सेलिना जेटलीने पीटरवर केलेल्या आरोपांचा खुलासा ‘हिंदस्तान टाइम्स’ या वेबसाइटने न्यायालयीन कागदपत्रांचा हवाला देत केला आहे. त्यानुसार पीटरच्या तापट स्वभावामुळे आणि मद्यपानामुळे सेलिनाला वैवाहिक आयुष्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागला. पीटर त्यांच्या मुलांसमोर सेलिनाशी गैरवर्तन करायचा आणि शिवीगाळ करत असल्याचा आरोप तिने केला आहे.
गुप्तांगात रॉड घालण्याची धमकी
पीटरने 2012 च्या दिल्ली सामूहिक बलात्काराचा उल्लेख करून धमकावल्याचा आरोप सेलिनाने तिच्या तक्रारीत केला आहे. कागदपत्रांमध्ये असं म्हटलंय की जेव्हा जेव्हा त्यांच्यात भांडणं व्हायची तेव्हा पीटर तिच्या गुप्तांगात रॉड घालण्याची धमकी द्यायचा.
इतर पुरुषांसोबत झोपण्यासाठी दबाव
इतकंच नव्हे तर पीटरने तिला इतर पुरुषांसोबत झोपण्यासाठी दबाव आणला असाही दावा सेलिनाने केला आहे. ऑफिसमधील आपलं स्टेटस सुधारण्यासाठी पीटरने सेलिनाला त्याच्या कंपनीच्या संचालक मंडळातील एका सदस्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास दबाव आणल्याचं तिने कागदपत्रांमध्ये म्हटलंय.
महागड्या भेटवस्तूंची मागणी
सेलिनाने तिच्या तक्रारीत पीटरवर तिच्याकडून आणि तिच्या कुटुंबाकडून महागड्या भेटवस्तूंची मागणी केल्याचा आरोप केला आहे. मला माहीत असलेल्या सर्व भारतीय वरांना त्यांच्या सासरच्यांकडून महागड्या भेटवस्तू मिळाल्या होत्या, असा दावा करत पीटरने सेलिनाकडे महागड्या भेटवस्तूंची मागणी केली. त्यानंतर सेलिनाच्या कुटुंबाने त्याला सुमारे 6 लाख किंमतीचे अनेक डिझायनर कफलिंक्सचे सेट भेट म्हणून दिले. शिवाय 10 लाख रुपयांचे दागिने दिले.
घराबाहेर काढलं
सेलिनाने असाही दावा केला की जुळ्या मुलांच्या जन्मानंतर तिने पीटरला पॅटर्निटी लीव्ह (पितृत्व रजा) घेण्याची विनंती केली होती. तेव्हा पीटरने तिला तिचा हात पकडून आणि धक्के मारून घराबाहेर काढलं होतं. त्यावेळी सेलिना ब्रेस्टफीडिंग ड्रेसमध्ये होती, तेव्हा शेजारच्यांनी तिची मदत केली होती.
