Chhaava: महाशिवरात्रीला ‘छावा’ गाठणार मोठा टप्पा? विकी कौशलच्या करिअरमधील सर्वांत मोठा चित्रपट
विकी कौशलचा 'छावा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवनवे विक्रम रचतोय. प्रदर्शनाच्या दुसऱ्या आठवड्यातही या चित्रपटाची चांगली कमाई सुरू आहे. 14 फेब्रुवारी रोजी हा बहुप्रतिक्षित चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.

विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘छावा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करतोय. विकी कौशलच्या करिअरमधील आणि 2025 या वर्षातील आतापर्यंतचा हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर 12 दिवस पूर्ण झाले असून जगभरात ‘छावा’ने 450 कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवला आहे. इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कने दिलेल्या वृत्तानुसार, प्रदर्शनाच्या दुसऱ्या मंगळवारी ‘छावा’ने 17 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे भारतात ‘छावा’च्या कमाईचा आकडा 362.25 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटाने आतापर्यंत एकूण 483.35 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
प्रदर्शनाच्या दुसऱ्या आठवड्यात ‘छावा’च्या दररोजच्या कमाईत घट होत असली तरी देशात प्रदर्शित होणाऱ्या इतर चित्रपटांच्या बाबतीत तो सर्वांत पुढेच आहे. दुसऱ्या शनिवारनंतर कमाईत विशेष घट पहायला मिळाली. मात्र येत्या एक ते दोन दिवसांत हा चित्रपट कमाईचा 500 कोटींचा टप्पा गाठणार, असा विश्वास चित्रपट व्यापार विश्लेषक व्यक्त करत आहेत. महाशिवरात्रीच्या सुट्टीनिमित्त प्रेक्षकांनी थिएटरमध्ये गर्दी केली तर या चित्रपटाच्या कमाईत मोठी झेप नक्कीच पहायला मिळेल. ‘छावा’ची निर्मिती दिनेश विजनने केली आहे. गेल्या वर्षी त्यांच्या ‘मॅडॉक फिल्म्स’ या कंपनीने ‘स्त्री 2’चीही निर्मिती केली होती. हा चित्रपटसुद्धा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.
View this post on Instagram
मंगळवारी पुण्यात ‘छावा’ या चित्रपटाचे 695 तर मुंबईत 1395 शोज होते. तरी पुण्यात प्रेक्षकवर्ग हा मुंबईच्या तुलनेनं अधिक होता. या चित्रपटात विकी कौशल आणि रश्मिका मंदानासोबतच अक्षय खन्ना, आशुतोष राणा, विनीत कुमार सिंह, दिव्या दत्ता, सुव्रत जोशी, सारंग साठ्ये, डाएना पेंटी यांच्याही भूमिका आहेत.
या चित्रपटावरून सध्या वाद सुरू आहे. चित्रपटात दाखवलेल्या गणोजी आणि कान्होजी यांच्या भूमिकेवरून हा वाद सुरू आहे. या भूमिकांविरोधात शिर्के घराणं आक्रमक झालं आहे. पानशेत धरण परिसरातील शिरकोली गावात कुलदैवत शिरकाई देवी मंदिरात सर्व कुटुंबीयांतील सदस्यांनी एकत्र येत गावाकऱ्यांसोबत याबाबत बैठक घेतली. मंदिरात शिरकाई देवीची आरती आणि पूजा करत छावा चित्रपटाचा दिग्दर्शकांच्या विरोधात रस्त्यावर आणि न्यायालयात लढाईला सुरुवात करत असल्याचा निर्णय त्यांनी घेतला. “विशिष्ठ वर्गाला वाचवून दुसऱ्याला बदनाम करू नये, ही बदनामी आमच्यासाठी नुकसानदायी आहे,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
